

भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथे कबड्डी केंद्र उभारण्यात आले आहे. परंतु, याच्या देखभाल व सुरक्षेकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने येथील केंद्राची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. कबड्डीच्या सरावासाठी उभारण्यात आलेले हे केंद्र आता मद्यपींचा अड्डा बनले आहे.
मैदानातील मोकळ्या जागेचा वापर आता तळीरामांकडून दारूची पार्टी करण्यासाठी होत आहे. मैदानावर मद्यपान करत असल्याचे धक्कादायक प्रकार दैनिक पुढारीने केलेल्या पाहणीत समोर आला आहे. यामुळे खेळाडूंची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. यामुळे संबंधित विभागाने येथील सुरक्षा वाढवून येथील अवैध गोष्टींना आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तळीरामांमुळे येथे सरावासाठी येणार्या खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भोसरी येथे महापालिकेच्या वतीने कबड्डी सारख्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र उभारण्यात आले आहे. परिसरातील खेळाडू येथे नियमित सरावासाठी येतात. मात्र, मद्यपींच्या वाढत्या उपद्रवामुळे खेळाडू आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीचा वेळीस मद्यपी बिनधास्तपणे या ठिकाणी दारू पित असल्याचे समोर आले आहे.
याठिकाणी तरुण व्यक्तींची वर्दळ वाढत असून, रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि कचरा मैदानावर विखुरलेला स्थितीत दिसून येत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने उपयोजना करत खेळाडूंचा सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी खेळाडू करत आहेत. मैदानाभोवती संरक्षणात्मक भिंतीचे उंची कमी असल्याने तसेच याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने या प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची तक्रार खेळाडू व नागरिक करत आहेत. पालिका प्रशासनाने तातडीने मैदान पुन्हा खेळाडूंसाठी सुरक्षित करावे, अशी मागणी खेळाडू व नागरिकांकडून होत आहे.
महापालिका प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. कबड्डी केंद्राचे मूळ उद्दिष्ट जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने याठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजेत. अन्यथा खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी उभारलेले कबड्डी केंद्रे कायमस्वरूपी बदनाम होण्याची भीती नाकारता येत नाही.
अनिल फुगे, प्रशिक्षक.
आम्ही आमच्या मुलांना कबड्डीचा सराव करण्यासाठी या केंद्रावर पाठवतो. परंतु येथे बिनधास्तपणे मद्यपी दारूच्या बॉटल आणून मद्य पीत बसलेले असतात. कधी कधी त्यांच्यात वाद होतात. यामुळे आमची मुले येथे सराव करताना त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न पालक करत आहेत.
खेळाडूंचे पालक