Criminal Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Crime Control: पिंपरी-चिंचवडमध्ये 368 तडीपार गुन्हेगार; एक्स-ट्रॅकर यंत्रणा निष्प्रभ, नागरिकांत भीती

एक्स-ट्रॅकर यंत्रणा अपयशी; दत्तक योजना बारगळल्याने शहरात गुन्हेगारांचा वावर वाढल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: शहरातील सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तडीपारीच्या कारवाया केल्या आहेत. मागील वर्षभरात तब्बल 368 गुन्हेगारांना शहराबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक तडीपार इसम शहरातच वावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे तडीपारीची कारवाई केवळ कागदावरच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकेशन टाकण्यासाठी गुन्हेगारांकडून टाळाटाळ

तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी एक्स ट्रॅकर हे मोबाईल ॲप सुरू केले होते. या ॲपच्या माध्यमातून संबंधित गुन्हेगाराने दररोज आपले करंट लोकेशन आणि सेल्फी पोलिसांना पाठवणे बंधनकारक करण्यात आले होते. सुरुवातीला या प्रणालीमुळे काही प्रमाणात नियंत्रण आल्याचे दिसून आले. मात्र, कालांतराने या यंत्रणेकडेच दुर्लक्ष होऊन ते बंद पडले. दरम्यान, एक्स ट्रेकर वापरताना अनेक तडीपार गुन्हेगारांनी नेट पॅक संपला, मोबाईल बंद आहे, कॅमेरा खराब झाला, डिस्प्ले फुटला, अशी कारणे देत पोलिसांना टोलवले होते. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीवरदेखील त्या वेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

‌‘त्या‌’ पोलिसांवर कारवाईची मागणी

तडीपार इसमांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या काही पोलिस अंमलदारांवर संशय व्यक्त केला जात आहे. चिरीमिरी घेऊन काही तडीपार गुन्हेगारांना शहरात येण्यास मूक संमती दिली जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे यापुढे तडीपार गुन्हेगार शहरात आढळल्यास संबंधित जबाबदार असणाऱ्या अंमलदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दत्तक योजना बारगळली

सराईत गुन्हेगारांवर सातत्याने नजर ठेवण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गुन्हेगार दत्तक योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याकडे एका सराईत गुन्हेगाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. संबंधित गुन्हेगार कोणासोबत उठबस करतो, त्याची हालचाल कुठे आहे, उपजीविका कशी चालते, याची माहिती ठेवणे अपेक्षित होते. मात्र, दरम्यानच्या काळात ही योजनाही बारगळल्याचे चित्र आहे.

एक्स ट्रॅकरचा नेमका उद्देश काय होता ?

तडीपार गुन्हेगार शहरात परत येऊन पुन्हा गुन्हे करू नयेत, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक्स ट्रॅकर हे मोबाईल ॲप सुरू केले होते. तडीपार गुन्हेगाराने ज्या जिल्ह्यात किंवा भागात वास्तव्य करण्यास सांगितले आहे, तेथून दररोज सेल्फी आणि करंट लोकेशन पाठवणे या ॲपद्वारे बंधनकारक करण्यात आले होते. संबंधित माहिती थेट पोलिसांकडे पोहोचत असल्याने तडीपार इसम शहरात आला आहे का, हे त्वरित तपासणे शक्य होत होते. सुरुवातीला या प्रणालीमुळे काही गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण मिळाल्याचे चित्र होते. मात्र, नंतर अनेकांनी बनावट कारणे देऊन या यंत्रणेला चकवा दिला. काही जण लोकेशन दुसऱ्या व्यक्तीकडून पाठवत होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष पडताळणीची गरज वाढली आहे.

दत्तक योजना का महत्त्वाची मानली जात होती?

सराईत गुन्हेगारांवर केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवावे, या उद्देशाने गुन्हेगार दत्तक योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याकडे एका सराईत गुन्हेगाराची जबाबदारी देण्यात आली होती. संबंधित गुन्हेगाराचे मित्र परिवार, आर्थिक स्रोत, दैनंदिन हालचाली, परिसरातील वावर, नव्याने तयार होणारे संपर्क आणि त्याच्या हालचालींमधील बदल याची माहिती ठेवणे अपेक्षित होते. एखादा गुन्हेगार पुन्हा सक्रिय होण्यापूर्वीच पोलिसांना त्याची माहिती मिळावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश होता. मात्र, कालांतराने नियमित फॉलोअप कमी झाल्याने योजना प्रभावहीन ठरत आहे.

रात्रीच्या सुमारास गुन्हेगार शहरात?

तडीपार आदेशानुसार संबंधित गुन्हेगाराला ठराविक कालावधीसाठी शहर किंवा जिल्ह्याबाहेर राहणे बंधनकारक असते. मात्र, प्रत्यक्षात अनेक तडीपार इसम पुन्हा शहरात येऊन जुन्या साथीदारांच्या संपर्कात राहत असल्याचे दिसून येते. काही जण रात्रीच्या वेळी शहरात येतात. तर, काही जण आपल्याच घरात लपून राहत असल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान अशा तडीपार इसमांवर अनेकदा कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, सातत्यपूर्ण मॉनिटरिंगचा अभाव, स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष आणि काही ठिकाणी होणाऱ्या कथित सेटिंगमुळे तडीपारीची भीती कमी होत आहे.

गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान, पोलिसांना चकवा देऊन तडीपार गुन्हेगारांचा शहरातील वावर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा कोयता गँग, दहशत, वाहन तोडफोड, खंडणीसारख्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे तडीपार आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

तडीपार केलेले गुन्हेगार पुन्हा परिसरात सापडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी केवळ तडीपारीची कारवाई करून थांबू नये. तर, संबंधित गुन्हेगार शहराबाहेर आहे का, यावर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे; अन्यथा नागरिकांचा पोलिस व्यवस्थेवरील विश्वास कमी होऊ शकतो.
अमित तलाठी, स्थानिक नागरिक, चिंचवड
तडीपार गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी विविध प्रणाली कार्यरत आहेत. शहरात आढळणाऱ्या तडीपार इसमांवर तातडीने कारवाई केली जाते. संबंधित करवाईचा आढावा घेऊन आणखी कडक पाऊले उचलले जातील.
मारुती जगताप, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT