Pimpri Online Medicine Ban Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Online Medicine Ban: पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्ट संघटनेचा देशव्यापी बंद; ऑनलाइन औषध विक्रीवर बंदीची मागणी

अडीच हजार औषध दुकाने बंद; ई-फार्मसीवर कठोर कारवाईची मागणी, नागरिकांना मात्र मोठा त्रास

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदला पिंपरी-चिंचवड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व होलसेलर तसेच रिटेल औषध विक्रेते या संपात सहभागी झाले होते. औषध व्यवसायाशी संबंधित गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता. यामुळे शहरातील जवळपास अडीच हजार औषध दुकाने बंद होती.

बेकायदेशीर व अनियंत्रित ऑनलाइन औषध विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, ई-फार्मसी व ऑनलाइन कंपन्यांकडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्टचे काटेकोर पालन करण्यात यावे, औषध विक्री क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,

औषध विक्रेत्यांवरील अन्यायकारक धोरणे मागे घेऊन लघू व मध्यम केमिस्ट व्यवसायांचे संरक्षण करण्यात यावे, रुग्णांना योग्य मार्गदर्शन, सुरक्षित औषध वितरण व प्रशिक्षित फार्मासिस्टची सेवा उपलब्ध राहावी, यासाठी पारंपरिक औषध विक्री व्यवस्था मजबूत करण्यात यावी आदी मागण्या या वेळी संघटनांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

महापौरांचे समर्थन

महापौर रवी लांडगे यांनी ऑनलाइन औषध विक्रीस विरोध केला आहे. तसेच, देशव्यापी संपाला पाठिंबा देत फार्मासिस्ट व औषध विक्रेत्यांच्या मागण्यांना त्यांनी समर्थन दर्शविले आहे.

ऑनलाइन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, स्थानिक फार्मासिस्ट आणि जनऔषध सेवा धोक्यात आली आहे. औषध हे केवळ उत्पादन नसून, तज्ज्ञ फार्मासिस्टच्या मार्गदर्शनाखाली दिली जाणारी आरोग्यसेवा आहे.
विवेक तापकीर, उपाध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट
माझ्या थायरॉईडच्या गोळ्या संपल्या होत्या. मी ते घेण्यासाठी नेहमीच्या औषध दुकानात आल्यानंतर समजले की आज संप असल्यामुळे दुकान बंद आहेत. थायरॉईडची गोळी एक दिवसही चुकवायची नसते. आता ज्या रुग्णालयाचे 24 तास मेडिकल सुरू असते, तिथं जावून बघणार आहे.
मीनाक्षी जाधव, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT