Pimpri Zoo Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Zoo Closed: 20 कोटी खर्चूनही पिंपरीतील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय बंदच; दहा वर्षांपासून नागरिकांची प्रतीक्षा कायम

कामे रखडली, मंजुरीचा अडथळा कायम; 24 कोटींच्या तिसऱ्या टप्प्यालाही विलंब, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: तब्बल 20 कोटी रुपयांचा खर्च करूनही, तसेच, स्थापत्य उद्यान-क्रीडा विभागाच्या कासवगती कामामुळे संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय तब्बल दहा वर्षांपासून बंद आहे. ते टाळे कधी निघणार, याबाबत नेमके उत्तर अधिकार्‍यांकडे नाही. महापालिकेच्या या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

संभाजीनगर येथील भर लोकवस्तीमध्ये तसेच, गर्द हिरवळीत सात एकर परिसरात हे प्राणिसंग्रहालय आहे. प्राणिसंग्रहालय सुशोभीकरण कामास मे २०१६ ला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून संग्रहालयास टाळे आहे. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या प्राणिसंग्रहालयामुळे पर्यटन वाढणार असून, दिल्लीच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अटी व नियमानुसार त्यांची फेररचना करून उभारणी करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

आत्तापर्यंत त्यासाठी वीस कोटींपेक्षा अधिक रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, काम संपलेले नाही. त्या कामात गैरव्यवहार झाला असून, सहा वर्षांत विविध ३६ प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू झाल्याबद्दल आयुक्त शेखर सिंह यांच्यासह प्रशासनाला नागपूरमधील डिसेंबर २०२३ च्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धारेवर धरण्यात आले. विरोधकांसह सत्ताधार्‍यांनी महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महापालिकेचे हे प्राणिसंग्रहालय राज्यात गाजले होते. त्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यानी प्राणिसंग्रहालयातील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे (एफडीसीएम) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयाचे उर्वरित काम केले जाणार आहे. जुनी निविदा प्रक्रिया रद्द करून, दोषी सल्लागारही बदलण्यात आला आहे. प्राणिसंग्रहालयासाठी सर्प, पक्षी व प्राण्याची काळजी घेण्यासाठी एक तज्ज्ञ सल्लागार नेमला आहे. आवश्यक मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे.

कामाच्या आराखड्यात बदल व सुधारणा करून नव्याने निविदा ९ ऑगस्ट २०२४ ला प्रसिद्ध करण्यात आली. ती निविदा वादग्रस्त ठरली. ती २४ कोटी रुपये खर्चाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून अंतिम मंजुरी मिळत नसल्याने काम ठप्प आहे, असा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून केला जात आहे. ते काम १५ महिने मुदतीचे आहे. त्यात प्राणी, पक्षी व सर्पासाठी योग्य अशी पर्यावरणपूरक अधिवास तयार करण्यात येणार आहे. प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतर सव्वावर्षात प्राणिसंग्रहालयातील उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, अनेक वर्षापासून प्राणिसंग्रहालयास टाळे असल्याने शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

उद्यानाचे टाळे कधी उघडणार, नागरिकांचा प्रश्न

अखेरच्या टप्प्यातील कामासाठी ठेकेदार नेमला असला तरी, अद्याप ते काम सुरू झालेले नाही. ते काम पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले होऊ शकते. मात्र, प्राणिसंग्रहालय नक्की कधी सुरू होणार याचे नेमके उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. मात्र, प्राणिसंग्रहालयाचे कामकाज स्वतंत्र कंपनी स्थापन करून चालवले जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर काम सुरू करू

प्राणिसंग्रहालयातील शेवटच्या टप्प्यातील सुशोभिकरण्याच्या कामाची निविदा पूर्ण झाली आहे. मात्र, दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजुरीबाबत तात्काळ कार्यवाही केली जात असल्याने काम सुरू करता आलेले नाही. मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केले जाईल. काम संपतात प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी केले जाईल, असे स्थापत्य उद्यान-क्रीडा विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.

प्राणिसंग्रहालयावर वारेमाप खर्च

  • पहिल्या टप्प्यात १३ कोटी रुपये खर्च : स्थापत्य कामे करण्यात आले. प्राणिसंग्रहालयासाठी प्रशासकीय इमारत, स्टोअरेज रूम व स्टाफ क्वॉर्टर, पक्ष्यांसाठी स्वतंत्र कक्ष, मगर व सुसर कक्ष, सर्पालय, अंतर्गत पादचारी मार्ग, स्वच्छतागृह हे काम करण्यात आले. ते काम डिसेंबर २०१८ ला पूर्ण झाले.

  • दुसर्‍या टप्प्यात पाच कोटी ८२ लाख रुपये खर्च : त्यात स्वतंत्रपणे सर्पोद्यान व पक्ष्यालय उभारण्यात आले. ते काम २०२२ च्या मध्याला पूर्ण झाले.

  • तिसरा टप्प्यात २४ कोटी रुपये खर्च : प्राणी, पक्षी व सर्पासाठी योग्य अशी पर्यावरणपूरक अधिवास तयार केला जाणार आहे. त्याबाबत बरीच चर्चा व खल झाल्यानंतर त्या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, काम अद्याप सुरू झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT