

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी चौक परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समतल विलगीकरण मार्ग (ग्रेडसेप्रेटर) रविवारी (दि. 19) पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे केंद्र ठरला. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास एक कंटेनर ग्रेडसेप्रेटरमध्ये अडकल्याने पुण्याकडे जाणार्या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. त्यामुळे चारचाकी, दुचाकी तसेच सार्वजनिक वाहतूक करणार्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुट्टीचा दिवस असूनही वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. विशेषतः दुपारनंतर कंटेनर, ट्रक आणि इतर मालवाहू वाहनांची वर्दळ वाढते. मात्र, मोरवाडी येथील समतल विलगीकरण मार्गाची उंची मर्यादित असल्याने अनेकदा उंच कंटेनर किंवा अवजड वाहने ग्रेडसेप्रेटरमध्ये अडकतात. यामुळे काही मिनिटांतच परिसरात वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरही जाणवतो.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी बराच वेळ लागला. मोरवाडी परिसरात अशी घटना प्रथमच घडलेली नाही. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे एक कंटेनर ग्रेडसेप्रेटरमध्ये अडकल्याने अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्या वेळीही नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच रुग्णवाहिकांना मोठा फटका बसला होता. वारंवार घडणार्या या घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, अंडरपासच्या दोन्ही बाजूंना उंचीची स्पष्ट सूचना, डिजिटल इशारा फलक, अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गदर्शन तसेच प्रवेशापूर्वी उंची तपासणारी 'हाइट गेज' व्यवस्था प्रभावीपणे उभारण्याची गरज आहे. संबंधित विभागांनी योग्य नियोजन न केल्याने ही समस्या कायम राहिल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
मोरवाडी चौक हा पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत वर्दळीचा भाग असून येथून पिंपरी, चिंचवड, पुणे आणि औद्योगिक परिसराकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. अशा महत्त्वाच्या मार्गावर वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे महापालिका, वाहतूक विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे या समस्येचा कायमस्वरूपी अभ्यास करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार होणार्या या घटनांमुळे केवळ वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाया जात नाही, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताणही निर्माण होतो. त्यामुळे मोरवाडी समतल विलगीकरण मार्गातील ही समस्या तातडीने सोडविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.