Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Accepted Corporators Election Delay: पिंपरीत स्वीकृत नगरसेवक निवड पुन्हा लांबणीवर; भाजपमधील मतभेद ठरले अडथळा

सर्वसाधारण सभा तहकूब; इच्छुकांची धाकधूक वाढली, 5 मेच्या बैठकीकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड सोमवारच्या (दि.20) सर्वसाधारण सभेत करण्यात येणार होती. मात्र, ती सभा तहकूब झाल्याने स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा लांबणीवर पडली आहे. परिणामी, इच्छुकांची धाकधूक आणखी वाढली आहे.

शेजारच्या पुणे महापालिकेत भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची यादी 9 मार्च 2026 ला जाहीर झाली. त्यानंतर सर्वसाधारण सभेत निवड प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने स्वीकृत नगरसेवकांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सात जागांसाठी तीनशेहून अधिक अर्ज इच्छुक असल्याने शहर भाजपाने स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय प्रदेश कमिटीवर सोपवला आहे. त्यात जुने विरुद्ध नवे, आमदार समर्थक विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष सुरू आहे.

दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग््रेासच्या तीन जणांची नावे आजच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर होती. त्यात माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका सीमा सावळे, पक्षाचे पदाधिकारी फजल शेख यांचा समावेश आहे. या तीन नावाची निवड 4 मार्च 2026 ला झाली आहे. मात्र, त्यांच्या नावावर सर्वसाधारण सभेकडून अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यांची निवड सत्ताधारी भाजपामुळे अडकून पडली आहे.

भाजपात आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे प्रमुख गट आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांची नावे सुचवली आहेत. दुसरीकडे भाजपातील एका गटाने ज्येष्ठ व निष्ठावंत अशी काही नावे सुचवली आहेत. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनेही काही नावे सुचवली आहेत. माजी नगरसेवक आणि पराभूत नगरसेवकही स्वीकृत नगरसेवक होण्यास तीव इच्छुक आहेत. त्यामुळे कोणती नावे घ्यायची आणि कोणती गाळायची याबाब एकमत होत नाही. भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नेमके कोणाला संधी द्यायची यावरून एकमत होत नाही आहे. ती नावे प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात आली आहेत. नावे अंतिम करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या सात नावावर भाजपाचे एकमत झाल्याचा दावा सत्तारूढ पक्षतेने प्रशांत शितोळे यांनी केला होता. त्यामुळे आजच्या सभेत सात जणांची निवड होण्याची शक्यता होती. मात्र, ती सभाच तहबूक झाल्याने त्या निवडी पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. आता, 5 मे रोजीच्या तहकूब सभेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ नाहक वाया

स्वीकृत नगरसेवकांची निवड 13 मार्च 2026 च्या सर्वसाधारण सभेत होणे अपेक्षित होते. मात्र, सत्ताधारी भाजपाचे सात नावे निश्चित होत नसल्याने त्या सभेत निवड न करता तो प्रस्ताव तहकूब करण्यात आला. त्यानंतर सोमवारच्या सभेतही ती निवड झाली नाही. सत्ताधाऱ्यांकडून स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय वारंवार लांबणीवर टाकला जात असल्याने स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी वाया जात आहे. परिणामी, त्यांना कमी कार्यकाळ मिळणार आहे.

राष्ट्रवादीची नावे बदलण्यासाठी भाजपाचा दबाव

राष्ट्रवादी काँग््रेासने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका सीमा साळवे आणि पदाधिकारी फलज शेख अशी तीन जणांची नावे दिली आहे. ती नावे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वीकारली आहेत. त्यातील त्रासदायक ठरणाऱ्या एकाचे नाव वगळावे, असा प्रयत्न भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून पडद्यामागे केला जात आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग््रेासच्या वरिष्ठ नेत्यांना विनवण्या केल्या जात आहेत. त्याबाबत ठोस निर्णय किंवा तडजोड होईपर्यंत भाजपाची सात नाव जाहीर केली जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लवकर आठ क्षेत्रीय अध्यक्षांची निवड

महापालिकेची शहरात एकूण आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षांची निवड केली जाते. त्यासाठी लवकरच निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधातील राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) आणि शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT