Pimple Nilakh Flyover Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Nilakh Flyover Issue: पिंपळे निलख उड्डाण पुलाचा तीव्र उतार ठरतोय धोकादायक; अपघातांनंतर सुरक्षितता ऑडिट होणार

रक्षक चौक परिसरातील पुलावर अपघातांच्या तक्रारी वाढल्या; वेगमर्यादा, सौर दिवे व सुरक्षा उपाययोजनांसह महापालिकेची दखल

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील नव्या उड्डाण पुलास तीव उतार असल्याने अपघात होत आहेत. त्यावरून महापालिका प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्याची दखल घेऊन वाहतूक सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी वाहतूक मंत्रालय तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून उड्डाण पुलाचे ऑडिट करण्यात येणार आहे.

सल्लागार संस्थेकडून कामाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी, सर्वेक्षण आणि अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या अहवालानुसार उड्डाण पूल, भुयारी मार्ग व त्यास जोडलेल्या रॅम्पच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भुयारी मार्ग आणि त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतार रस्त्यांवर वाहनांना एकमेकांना ओलांडण्यास मनाई करण्यात आली आहे. इंडियन रोड काँग््रेासच्या (आयआरसी) मानकांनुसार सुरक्षित वेगमर्यादा दर्शविणारे ताशी 30 किलोमीटर वेगमर्यादेचे अनिवार्य फलक लावण्यात आले आहेत.

भुयारी मार्ग व त्याच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पवर संथ गतीने चालणारी वाहने, सायकलस्वार व पादचारी यांना प्रवेशबंदी केली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र समतल सेवा (ग््रेाडसेपरेटर) रस्त्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे उड्डाण पुलाचा मार्ग हा केवळ वाहनांच्या वाहतुकीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बीआरटी मार्गावरील बस जलद वाहतूक व्यवस्थेसाठी ताशी 30 किलोमीटर सुरक्षित वेगमर्यादेसह स्वतंत्र मार्गिका केली आहे.

धोकादायक ठिकाणी पिवळे दिव्याचे खांब

उताराच्या रस्त्यांवर वेग नियंत्रणासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी भारतीय मानांकनानुसार आडव्या पट्‌‍ट्यांचे चिन्हांकन करण्यात आले आहे. वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी मार्ग एकत्र येणाऱ्या आणि विभाजित होणाऱ्या ठिकाणी तसेच, धोकादायक ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे पिवळे दिव्याचे खांब उभारले आहेत. या उपाययोजनांमुळे वाहनचालकांना वेग कमी करण्याचा इशारा मिळून अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.

रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढविण्यासाठी संरक्षक कठड्यांवर मध्यदर्शक बसविण्यात आले आहेत. या मध्यदर्शकांवर पिवळ्या रंगाची प्रकाश परावर्तित करणारी पट्टी बसविण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण पुलावर ताशी 30 किलोमीटर वेगमर्यादा दर्शविणारे वाहतूक नियंत्रण फलक लावण्यात आले आहेत.
प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका
रक्षक चौकातील उड्डाण पूल व भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. वाहतूककोंडी कमी होऊन अडथळाविरहीत प्रवासासाठी हा भुयारी मार्ग सोयीचा ठरणार आहे. नागरिकांनी वेगमर्यादा व वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. बीआरटीएस मार्गात खासगी मोटार कार व दुचाकीस्वारांनी वाहनांनी प्रवेश करू नये.
कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT