Pimple Gurav Transformer Fire Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Transformer Fire: कृष्णा चौक परिसरात रोहित्राला भीषण आग; अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर

अनधिकृत टपऱ्यांमुळे आगीला वाढलेले स्वरूप; सुदैवाने जीवितहानी टळली, नागरिकांकडून कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: नवी सांगवीतील कृष्णा चौक ते एम. एस. काटे चौक मार्गावर मंगळवारी रात्री रोहित्राला अचानक आग लागली होती. यामध्ये ज्ञानेश पार्कजवळील महावितरणचे रोहित्र भीषण आगीत खाक झाले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांच्या अतिक्रमणाचा गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

टपऱ्यांमधील सिलिंडर काढले बाहेर

रोहित्राच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या तीन अनधिकृत टपऱ्यांनी या आगीला अधिकच खतपाणी घातले. अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या या रोहित्रामुळे आग वेगाने पसरली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली. या टपऱ्यांपैकी एका ठिकाणी असलेला गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

वीजपुरवठा केला खंडित

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तर, महावितरण अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित करून पुढील धोका रोखला. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी रोहित्र आणि डीपी बॉक्सच्या अगदी शेजारीच बिनधास्त उभ्या राहिलेल्या शेडच्या अतिक्रमणांनीच या घटनेला भीषण रूप दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

अतिक्रमण हटविण्याची मागणी

नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात विद्युत उपकरणांच्या आजूबाजूला टपऱ्या आणि पत्र्याच्या शेड्‌‍सचा वाढलेला विळखा हा केवळ बेकायदेशीरच नाही, तर थेट जीवघेणा ठरत आहे. नियमांनुसार अशा उपकरणांपासून सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र अतिक्रमणांना मोकळे रान मिळाले आहे. महावितरण आणि महापालिका प्रशासन यांच्यातील टोलवाटोलवी कारवाईतील उदासीनता आणि बेफिकीर दुर्लक्षामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आज रोहित्र जळाले उद्या एखादा निष्पाप जीव गेला तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. अग्निशमन दलालाही आपत्कालीन परिस्थितीत मार्ग काढणे कठीण होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या घटनेने प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून, आता तरी अतिक्रमण हटवण्याबाबत ठोस पावले उचलली जाणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जीवितहानी नाही

रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास अचानक ठिणग्या उडाल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेदरम्यान एस. के. बिर्याणी हाऊस येथील डीपी व बाहेरच्या चायनीज शेडला आग लागली. ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आणि आगीचा फैलाव वेगाने वाढला. कृष्णा चौक ते एम. एस. काटे चौक हा संपूर्ण परिसर खाऊगल्ली म्हणून ओळखला जातो. सांगवी, पिंपळे गुरव, औंध, दापोडी तसेच इतर परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने येथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. त्यामुळेच या ठिकाणी गर्दीचे प्रमाण मोठे असून, अशा दुर्घटनेने संभाव्य मोठ्या जीवितहानीचा धोका निर्माण झाला होता.

विद्युत ट्रान्सफॉर्मर तसेच डीपी बॉक्सपासून सुरक्षित अंतर ठेवणे खूप गरजेचे आहे. अनेक व्यावसायिक आपली दुकाने किंवा स्टॉल्स डीपी बॉक्सच्या अगदी जवळ लावतात, जे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी योग्य अंतर ठेवूनच आपला व्यवसाय करावा. यामुळे अपघात टाळता येतील आणि कोणालाही विनाकारण त्रास होणार नाही
संतोष पांचरस, सहायक अभियंता, महावितरण पिंपळे गुरव
नागरिक व व्यावसायिकांनी विद्युत ट्रान्सफार्मरच्या डीपी बॉक्सपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. सुरक्षेच्यादृष्टीने नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील. तसेच, सर्वांनी सहकार्य केल्यास प्रशासनालाही काम करणे सुलभ होईल आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळता येईल.
पूजा पाटील दुधनाळे, प्रशासन अधिकारी, ह क्षेत्रीय कार्यालय, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT