

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वातावरणात उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला असून, तापमानाची नोंद 39 अंश सेल्सिअस झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस उकाड्यात वाढ होत आहे. नागरिकांना उकाड्यातून काही दिलासा मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवार (दि. 17) तर तापमानाने उच्चांक गाठला असून, शहरात 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
गेले आठ दिवसांपासून तापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे जात आहे. उष्णतेमुळे तापमानात वाढ होऊन अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हात फिरणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी, चक्कर, मळमळ आणि उलटीचे त्रास जाणवत आहेत.
उन्हापासून संरक्षण म्हणून टोपी, छत्री, गॉगल घेतले तरी उन्हाचे चटके जाणवत आहेत. शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट जाणवत आहे. वाढलेल्या तापमानामुळे फॅनची हवादेखील गरम जाणवत आहे. दिवसा अन रात्रीही घामाघूम झालेले नागरिक थंडावा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी उष्माघात आणि उन्हापासून होणाऱ्या इतर विकारापासून काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
उन्हात जाताना घ्या ही खबरदारी
वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे, उन्हाळ्यात दुपारी फिरणे टाळावे, शेतातील, रस्त्यांची कामे सकाळी लवकर करावी, उन्हात काम करणे किंवा बाहेर पडणे आवश्यक असेल तर डोक्यावर व कानावर पांढरे कापड किंवा टोपी घालून, डोळ्याला गॉगल लावूनच जावे, उन्हाळ्यात रंगीत कपडे अथवा विविध रंगाची वस्त्रे वापरू नये, पांढरी सैल वस्त्रे वापरावीत, उन्हाळ्यात शरीरातून निघणाऱ्या घामामुळे खूप थकवा जाणवतो हे लक्षात घेऊन उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे, रसाळ फळांच्या सेवनाला प्राधान्य द्यावे, काकडी, आंबे, चिकू, टरबूज, कलिंगडे या फळांचा जास्त वापर करावा. लिंबू सरबत, ताक, दही, लस्सी, उसाचा रस अशा थंडपेयांचे सेवन करावे.
खालील गोष्टी टाळा
बाजारातील रसायनिक द्रव्ये वापरेली थंडपेय पिऊ नये. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. एसीमधून लगेच बाहेर उन्हात पडू नये. स्वत:ला सामान्य तापमानात ठेवून मगच बाहेर पडावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गृहिणींनी मोकळ्या हवेतील स्वयंपाक घराची दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात. जास्त वेळ उन्हात थांबू नये.