

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरहून अधिक सदनिका असलेल्या हाऊसिंग सोसायट्यांना मैलासांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) सुरू करण्याबाबत महापालिकेने अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. तरीही, तब्बल 99 सोसायट्यांमधील एसटीपी बंद स्थितीत आहेत. विविध कारणे पुढे करून एसटीपी बंद ठेवला जात आहे. एसटीपी सुरू न करणाऱ्या सोसायट्यांचा नळजोड तोडण्याचा तसेच, दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने विस्तारत असून लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. सध्या शहरवासीयांना 650 एमएलडी पाणी एका दिवसाला दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील अनेक मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना खासगी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे बोरवेल व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. विस्कळीत, अपुरा, दूषित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींचा पाऊस सारथी हेल्पलाइनवर पडत आहे. त्यातून महापालिकेने एसटीपी बंद असलेल्या सोसायट्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेने शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायटीचे सर्वेक्षण केले आहे. त्यात अनेक सोसायट्यांचे एसटीपी सुरू नसल्याचे आढळून आले आहे. तर, काही एसटीपी केवळ नावापुरते आहेत. काही सोसायटीचे सांडपाणी थेट महापालिकेच्या ड्रेनेजलाईन किंवा नाल्यात सोडले जाते. तर, काही सोसायटीत महापालिकेच्या पथकास प्रवेश दिला गेला नाही. पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर त्या सोसायट्यांनी प्रवेश दिला. एसटीपी सुरू न ठेवल्याने महापालिकेने त्या सोसायट्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रथम दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या पिण्याचा पाण्याचा नळजोड तोडला जाणार आहे. त्यानंतर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
एसटीपीमुळे पिण्याच्या पाण्याची बचत
शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांनी एसटीपी सुरू केल्यास त्यांनी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया होऊन पुन्हा पाणी उपलब्ध होते. ते पाणी स्वच्छतागृहाचे फ्लॅश, कुंड्या, उद्यान, हिरवळ तसेच, पार्किंग, वाहन आणि आवार स्वच्छतेसाठी वापरले जाते. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा पाण्याचा वापर कमी होऊन त्या पाण्याची बचत होते. परिणामी, शहरात पिण्याचे अतिरिक्त पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत नाही, असा दावा महापलिका प्रशासनाने केला आहे.
मोठ्या सोसायट्यांना एसटीपी बंधनकारक
एकत्रीत बांधकाम व विकास नियमावलीनुसार (युडीसीपीआर) वीस हजार चौरस मीटरपुढील क्षेत्रफळावरील, शंभर सदनिका आणि दररोज वीस हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या हाऊसिंग सोसाट्यांना पाण्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रिकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी सोसायटीच्या आवारात एसटीपी उभारणे आवश्यक आहेत. तो एसटीपी नियमितपणे सुरू ठेवणे सक्तीचे केले आहे. त्या संदर्भात महापालिकेने सोसायट्यांच्या बैठक घेऊन मार्गदर्शनही केले आहे. एसटीपीसंदर्भातील खासगी एजन्सीची यादीही त्यांना देण्यात आली आहे. शहरात 494 मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. त्यांपैकी 395 सोसायट्यांमधील एसटीपी सुरू आहेत. तर, वारंवार नोटीसा देऊनही 99 सोसायट्यांमधील एसटीपी बंद आहेत.
एसटीपी सुरू ठेवण्यासाठी महापालिकेकडून मार्गदर्शन
शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांची महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून नियमितपणे तपासणी केली जाते. त्यात काही सोसायट्यांनी एसटीपी बंद ठेवण्याचे आढळून आले. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एसटीपी सुरू ठेवण्याबाबत त्यांना आवश्यक माहितीही देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य महापालिकेकडून करण्यात येत आहे, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सांगितले.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून नोटिसा दिल्यानंतरही शहरातील 99 हाऊसिंग सोसायट्यांमधील एसटीपी बंद असल्याचे आढळून आले आहे. त्या सोसायटीधारकांनी तातडीने एसटीपी प्रकल्प सुरू करावेत, असे बजावण्यात आले आहे. तसे न केल्यास त्याचा नळजोड तोडला जाणार आहे. दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे.
संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका