Pimple Gurav Stray Dogs Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Stray Dogs: पिंपळे गुरवमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा पदपथ धोकादायक

नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी, कचरा आणि शिळ्या अन्नामुळे कुत्र्यांचा वावर वाढला; निर्बीजीकरण व लसीकरणासह तातडीच्या कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आणि पदपथावर सध्या मोकाट कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. दिवसभरात विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावरून तसेच पदपथावरून नागरिक आणि वाहनांची मोठी रेलचेल असते. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शाळकरी विद्यार्थी पिंपळे गुरव येथील बस स्टॉपवर जाण्यासाठी याच पदपथाचा प्रामुख्याने वापर करतात. सध्या या पदपथावर फिरणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे पादचारी आणि वाहनचालक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.

सध्या तुळजाभवानी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात सुरू आहे. या नऊ दिवसांच्या काळात देवीच्या दर्शनासाठी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांची व नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मंदिराकडे जाणारे रस्ते आणि पदपथ गजबजलेले असतात. मात्र, अशा पवित्र व गर्दीच्या काळातही मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कायम असल्याने भाविक, विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेने तत्काळ कारवाई करण्याची मागणी

स्थानिक नागरिकांनी आणि भाविकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व पशुवैद्यकीय विभागाकडे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. पदपथावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व त्यांना पकडण्याची मोहीम तत्काळ राबवून पदपथ पूर्णपणे भयमुक्त करावे, अशी मागणी होत आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे कुत्र्यांचा वावर वाढला

तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या पदपथावर काही बेजबाबदार नागरिकांकडून उघड्यावर कचरा व शिळे अन्न टाकले जात आहे. खाण्याच्या शोधात असणारी मोकाट कुत्रे येथे मोठ्या संख्येने एकत्र जमा होतात. त्यामुळे या भागाला जणू कचराकुंडी आणि कुत्र्यांच्या अड्ड्याचे स्वरूप आले असून, परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

पादचारी, वाहनचालकांवर थेट हल्ले

सकाळ-संध्याकाळ पिंपळे गुरव बसस्थानकातून कामासाठी जाणाऱ्या नागरिकांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर ही कुत्रे अचानक भुंकत अंगावर धावून जात आहेत. तसेच, नवरात्रोत्सवाच्या गर्दीतून जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहनचालकांच्या मागे कुत्रे लागल्यामुळे अनेकदा अपघाताची भीती निर्माण होत आहे.

संबंधित विभागातर्फे लवकरच घटनास्थळी विशेष पथक पाठविण्यात येणार आहे. या पथकाद्वारे मोकाट कुत्र्यांना पकडण्याचे ऑपरेशन तसेच त्यांचे लसीकरण आणि निर्बीजीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविली जाईल.
अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड मनपा.
मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह असताना आणि भाविकांची गर्दी असताना मोकाट कुत्र्यांचा हा त्रास जीवघेणा ठरत आहे. प्रशासनाने नुसते आश्वासन न देता लवकरात लवकर प्रत्यक्ष कारवाई करून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून महिला, लहान मुले आणि भाविकांना भयमुक्‍त प्रवास करता येईल.
अमर अदियाल, सामाजिक कार्यकर्ता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT