Pimple Gurav Encroachment Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Encroachment: पिंपळे गुरवमध्ये महापालिका कार्यालयाच्या इमारतीखालीच अतिक्रमण; ‘दिव्याखाली अंधार’ची नागरिकांत चर्चा

पक्क्या शेडसह पदपथावर अतिक्रमणाचा आरोप; २५ ते ३० व्यापाऱ्यांना नोटिसा, कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: महापालिकेच्‍या क्षेत्रीय कार्यालयालगत बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांचा सुळसुळाट सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ज्या कमर्शियल इमारतीमध्ये महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आहे. त्याच इमारतीच्या तळमजल्यावरील व्यावसायिकांकडून इमारतीसमोरील मोकळ्या जागेत फॅब्रिकेशनचे पक्के शेड उभारण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. यामुळे महापालिकेचा कारभार म्हणजे दिव्याखालीच अंधार असल्याची चर्चा नागरिकांत आहे. यामुळे पदपथावर व क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. येथील अतिक्रमण त्‍वरित हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

इमारतीसमोरील मोकळी जागा, पदपथ तसेच वाहतुकीसाठी वापरली जाणारी जागा व्यावसायिक कारणासाठी वापरली जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित इमारतीचा मंजूर बांधकाम नकाशा आणि प्रत्यक्ष बांधकामाची स्थिती तपासण्याची मागणी होत आहे. महापालिकेचे अधिकारी याच इमारतीत बसत असताना त्यांच्या कार्यालयाच्या खालीच नियमबाह्य बांधकाम होत असेल तर अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्‍ह उपस्थित होत आहे.

पदपथ अतिक्रमणाच्‍या विळख्यात

संत तुकारामनगर हा कायम वर्दळीचा परिसर आहे. वायसीएम रुग्णालय तसेच विविध खासगी रुग्णालय आणि विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच शासकीय कार्यालयांमुळे या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, मोकळ्या जागेवरील अतिक्रमणामुळे ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पदपथांवर अतिक्रमण, रस्त्यावर बेशिस्त पार्किंग आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीसोबतच आपत्कालीन वाहनांच्या मार्गातही अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे.

केवळ नोटीसचा फार्स

महापालिकेने संबंधित इमारतीची मंजूर बांधकाम परवानगी आणि प्रत्यक्ष बांधकामाची संयुक्त पाहणी करावी. फ्रंट मार्जिन, पदपथ किंवा सार्वजनिक वापरासाठीची जागा अतिक्रमित असल्याचे आढळल्यास मोजणी करून पंचनामा करावा. नियमबाह्य शेड किंवा बांधकाम असल्यास नियमानुसार कारवाई करून ते तातडीने हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. फायर ब्रिगेड आणि रुग्णालये जवळ असल्याने या परिसरातील रस्ते व प्रवेशमार्ग कायम मोकळे ठेवण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी आहे.

प्रशासनाची बघ्याची भूमिका

महापालिकेचे अधिकारी याच इमारतीत बसत असताना त्यांच्या डोळ्यांसमोरच अतिक्रमण होत असेल तर सामान्य नागरिकांनी तक्रार नेमकी कुठे करायची? असा सवाल संत तुकाराम नगरमधील नागरिकांनी उपस्थित केला आहे. अपघात किंवा मोठी वाहतूक कोंडी होण्याची वाट न पाहता महापालिकेने तातडीने पाहणी करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने नागरिकांनी तक्रारी करावी आणि मग आम्‍ही कारवाई करावी, अशी भूमिका न घेता आपले कर्तव्य पार पाडावे, अशी भावना नागरिक व्यक्‍त करत आहेत. केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये.

म्हाडाच्या कमर्शियल गाळ्यासमोरील सहा मीटर जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे पादचारी व वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, वायसीएम रुग्णालय आणि अग्निशामक केंद्र परिसर या भागात असल्याने येथे मोठी वर्दळ असते. व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत पक्क्या शेडऐवजी नियमबाह्य अतिक्रमण हटविण्यात येणार असून, पादचारी व वाहतुकीसाठी आवश्यक जागा मोकळी ठेवली जाईल. नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि व्यापाऱ्यांनाही न्याय मिळेल, अशी भूमिका प्रशासनाने घ्यावी.
योगेश बहल, नगरसेवक.
सर्व संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. अनधिकृत शेड व अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासाठी संधी देण्यात आली असून, त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्यास पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येईल. सुमारे 25 ते 30 व्यापाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आल्या असून, नियमानुसार अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.
अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी, ल क्षेत्रीय कार्यालय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT