Pimpri Chinchwad Worker Compensation: पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या वारसांना मदतीत भेदभाव? महापालिकेचे निश्चित धोरणच नाही

कंत्राटी कामगारांच्या मृत्यूनंतर आर्थिक मदत अनिश्चित; खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास ५ लाखांची तरतूद, मात्र अद्याप एकालाही लाभ नाही
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात एखाद्या दुर्घटनेत कामगाराचा तसेच, नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून त्यांच्या वारसांना योग्य प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणे अपेक्षित आहे; मात्र महापालिकेचे त्यासंदर्भात कोणतेही धोरण नसल्याने घडलेल्या दुर्घटना किंवा अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देऊ केली जाते. मात्र, शहरातील अनेक कामगारांच्या वाट्याला कोणतीही आर्थिक मदत पोहचत नाही. त्या कामगारांनाही न्याय हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad BRT Route: बीआरटी मार्गावरच खासगी वाहनांचा कब्जा; पीएमपीएमएल बसला स्थानकात प्रवेश करताना कसरत

शहर 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. शहरात चारी बाजूने लोकवस्ती वाढत असल्याने लोकसंख्या फुगत चालली आहे. तसेच, शहरात औद्योगिक भागही मोठ्या प्रमाणात आहे. आग, होर्डिंग कोसळणे, बांधकाम पडणे, पाण्यात बुडणे, इमारतीवरून पडणे, अडकून पडणे, कुत्र्यांचा चावा या सह वेगवेगळ्या दुर्घटना शहरात सातत्याने घडत आहेत. तसेच, वाहन व रस्ते अपघात, कंपनी, वर्कशॉप, गोदाममधील दुर्घटना वारंवार होत आहेत. शहरात अशा दुर्घटना किंवा अपघात घडल्यास त्या बळी गेलेल्या नागरिक किंवा कामगारांच्या वारसांना महापालिकेकडून आर्थिक मदत दिली जावी, अशी अपेक्षा केली जात आहे. त्याबाबत विविध कामगार संघटना, संस्था, राजकीय पक्ष, नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींकडून आग्रह धरला जात आहे. मात्र, महापालिकेकडून घडलेली घटना, त्यांचे गांभीर्य आणि लोकप्रतिनिधींचा दबाव लक्षात घेऊन आर्थिक मदत केली जाते. अनेक प्रकारात मृत कामगारांच्या वारसांना कोणतीच मदत दिली जात नाही. ही बाब श्रीमंत म्हणून नावलौकीक असलेल्या महापालिकेस शोभत नाही. शहरात दुर्घटना आणि अपघात मृत झालेल्या कामगार तसेच, नागरिकांना आर्थिक साह्य केले जावे, अशी मागणी केली जात आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Ekvira Devi Temple Ropeway Protest: एकवीरा देवी मंदिर परिसरातील समस्यांवर ग्रामस्थ आक्रमक; रोप वे रद्द करण्यासाठी रास्ता रोको

अनेक दुर्घटनेत कुटुंबीय नुकसान भरपाईपासून वंचित

वादळी वार्‍यामुळे रावेत-किवळे येथे जाहिरात होर्डिंग कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले. ती घटना 17 एप्रिल 2023 ला घडली होती. तळवडे येथे स्पार्कल फायर कॅण्डल बनवणार्‍या कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत 14 महिला कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. ती घटना 8 डिसेंबर 2023 ला घडली होती. महापालिकेच्या कासारवाडी येथील ह क्षेत्रीय कार्यालय इमारतीवरील विद्युत रोषणाईच्या माळा काढताना खाली पडून 18 ऑगस्ट 2026 ला एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. चिंचवड येथील बीएसएनएलच्या केबल डक्टमध्ये गुदमरून दोन कर्मचार्‍यांचा 27 ऑगस्ट 2026 ला मृत्यू झाला. त्या ठिकाणी गेल्या वर्षी 15 ऑगस्टला तीन कर्मचार्‍यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. अशा प्रकारे शहरात वर्षभरात अनेक दुर्घटना व अघपात घडतात. मात्र, महापालिकेकडून दुर्घटनेतील प्रत्येक कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. जखमींना मोफत वैद्यकीय उपचार दिले गेल्याचे दिसून आले आहे. मृत्यूनंतरही कामगारनगरीत महापालिकेकडून कामगारांबाबत भेदभाव केला जात असल्याचे भेदक वास्तव आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Dapodi Encroachment: दापोडीच्या रस्त्यांवर अतिक्रमणांचा विळखा; बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

आर्थिक मदतीबाबत महापालिकेचे धोरणच नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचार्‍यांचे दुर्घटनेत मृत्यू झाल्यास नियमानुसार त्यांच्या वारसांना आर्थिक मदत केली जाते. मात्र, महापालिकेच्याच कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी व कामगारांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य करण्याबाबत कोणतेही निश्चित धोरण नाही. संघटना तसेच, नगरसेवकांकडून त्यासंदर्भात आवाज उचलल्यानंतर महापालिकेस जाग येते आणि अर्थसाह्य केले जाते. अन्यथा अनेक दुर्घटनेत महापालिकेकडून कोणतेही आर्थिक मदत केली गेलेली नाही.

शहीद जवानाच्या वारसाला भरपाई

ड्रेनेजलाईनचे काम करताना माती अंगावर पडून अडकून पडलेल्या मजुरांना वाचवताना महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा फायरमन विशाल जाधव यांचा मृत्यू झाला होता. ती घटना 1 डिसेंबर 2019 ला दापोडी येथे घडली होती. त्या फायरमनला शहीद दर्जा देण्यात आला. त्या कर्मचार्‍यांच्या वारसांना एकूण 25 लाख रुपये, घर आणि एका वारसाला महापालिकेत नोकरी देण्यात आली आहे. तसेच, फायरमनच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत वेतन देण्यात येत आहे. महापालिका इतिहासात शहीद दर्जा मिळालेला तो पहिला कर्मचारी आहे. आरोग्य विभागातील जनजागृतीसाठी नेमलेला कंत्राटी स्वयंसेवक कर्मचार्‍याला कामावर असताना विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला संबंधित ठेकेदाराकडून 15 लाख रुपयांची मदत मिळवून देण्यात आली होती.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Kasarwadi BRTS Traffic Jam: कासारवाडी बीआरटीएस थांब्यावर पीएमपीएमएल बस बंद; वाहतूक कोंडीने वाहनांच्या रांगा

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यूप्रकरणी अद्यापही नाही पाच लाखांचा मोबदला

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 2 हजार 250 किलोमीटर अंतराचे डांबरी आणि काँक्रीटचे रस्ते आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जखमी किंवा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाल्यास महापालिकेडून नुकसान भरपाई म्हणून जखमीला 50 हजार ते 2 लाख 50 हजारांपर्यंत मोबदला दिला जाणार आहे. मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मोबदला महापालिका देणार आहे. मुंबई उच्च न्यायालच्या आदेशामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मात्र, हा नियम लागू झाल्याच्या 13 नोव्हेंबर 2025 यापासून एकाही जखमी किंवा मृतास या प्रकरणात मदत दिली गेलेली नाही. त्यासंदर्भात एकही प्रकरण महापालिकेकडे आले नसल्याचे स्थापत्य विभागाकडून सांगितले जात आहे.

प्रकरण तपासून आर्थिक मदतीचा निर्णय

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचार्‍यांचा कामावर असताना दुर्घटनेत मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला नियमानुसार सर्व आर्थिक लाभ दिले जातात. तर, कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी व इतर विभागांच्या कामगारांचा मृत्यू झाल्यास ते प्रकरण तपासून माणुसकीच्या भावनेतून महापालिकेकडून आर्थिक मदत दिली जाते. अशा प्रकारात मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना किती आर्थिक मदत द्यावी, या संदर्भात महापालिकेचे धोरण नाही, असे महापालिकेचे मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी सांगितले.

logo
Pudhari News
pudhari.news