पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विलनीकरण झाल्यानंतर चार पेठांच्या जागा यादेखील समाविष्ट झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून त्या मोकळया जागांकडे दुर्लक्ष केल्याने त्यावर अतिक्रमण, तात्पुरते शेड, दुकाने, पर्त्यांचे गोदामे उभारण्यात आली आहेत. दरम्यान, आता त्या जागा मोकळ्या करण्यासाठी पीएमआरडीएने सर्व्हेक्षण सुरू केले असून, त्यावर अतिक्रमण हटविण्यात येणार आहेत.
नियोजनबद्ध विकासाचा अभाव
पुणे शहराच्या हद्दीबाहेर म्हणजेच पिंपरी चिंचवड शहराचा औद्योगिक विकास झाल्याने कारखान्यातील कामगारांची निवासाची सोय व्हावी, यासाठी साधारण 1972 मध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली होती. नवनगर उभारणीसाठी जमीन संपादित करणे, त्या जमिनीचा योग्य व नियोजनबद्ध विकास करणे, विकसित झालेले भूखंड निवासी, शैक्षणिक, औद्योगिक कारणांसाठी उपलब्ध करून देणे हा होता.
या वेळी जवळपास 10 गावांचे मिळून प्राधिकरणाची स्थापना झाली होती. त्यानुसार, पेठ 8, 9, 11 आणि 12 येथील जमिनीचे संपादन करण्यात आले. मात्र, त्या जागेवर नियोजनबद्ध विकास झाला नाही. काही जागांवर सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी घरे उभारण्यात आली. तर, काही जागांवर प्रकल्प उभारले.
दरम्यान, जून 2021 मध्ये जुने पीसीएनटीडीए अर्थात नवनगर विकास प्राधिकरण हे पीएमआरडीए विलीनीकरण झाले. अर्थात त्यांच्या जागा यादेखील पीएमआरडीकडे आल्या आहेत. तर, काही विकास झालेला भाग हा महापालिकेकडे देण्यात आला. दरम्यान, पीएमआरडीकडे आलेल्या मोकळे भूखंड आणि जागांवर गेल्या काही वर्षांत अतिक्रमणे झाली आहेत. परिणामी, त्या जागा भविष्यात बळकावू नये, यासाठी सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या परताव्यासाठी प्रयत्न सुरू
पीएमआरडीएकडून सध्या नवे प्रकल्प सुरू होणार आहेत. तसेच, शेतकऱ्यांच्या परताव्यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्याचा परतावा देण्यासाठी जागांची माहिती काढण्यात आली. त्या वेळी काही जागांवर अतिक्रमण असल्याचे लक्षात आल्यानंतर ती जागा मोकळी करण्याची ठरवले आहे. त्यामुळे या अनुषंगाने सर्वेच जागांची पाहणी व सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.