PCMC Website Leadership Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Website Leadership Update Issue: महापौर बदलले, पण संकेतस्थळावर आयुक्तच ‘बॉस’; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा डिजिटल गोंधळ उघड

रवी लांडगे महापौर झाल्यानंतरही संकेतस्थळ अपडेट नाही; उपमहापौर व पक्षनेत्यांची माहिती गायब

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट जाऊन लोकप्रतिनिधींचे राज्य शुक्रवारपासून (दि. 6) सुरू झाले आहे. त्याला आठवडला उलटूनही महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हेच अद्याप ‌‘बॉस‌’ असल्याचे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्पष्ट होत आहे. संकेतस्थळावर आयुक्तांचे छायाचित्र व संपूर्ण माहिती आहे. मात्र, महापौरांचे छायाचित्र नावापुरते दर्शविण्यात आले आहे. उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता यांची छायाचित्रे व माहिती अद्याप देण्यात आलेली नाहीत. या ढिसाळ कारभारावरुन संताप व्यक्त केला जात आहे.

मुदतीमध्ये निवडणुका न झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. तेरा मार्च 2022 पासून महापालिकेत आयुक्तांमार्फत प्रशासकीय राजवट सुरू झाली. ती 5 फेबुवारी 2026 पर्यंत सुरू होती. निवडणूक होऊन महापौरपदी भाजपचे रवी लांडगे हे 6 फेबुवारीला विराजमान झाले. त्या दिवसापासून महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. त्याला आठवडा होत आला आहे. मात्र, महापालिकेच्या ुुु. लािलळपवळर. र्सेीं.ळप या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप आयुक्तच ‌‘बॉस‌’ असल्याचे ठळकपणे दर्शविण्यात आले आहे.

संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे छायाचित्र असून, त्यांची संपूर्ण माहिती, संपर्क क्रमांक आणि मेल आयडी देण्यात आला आहे. मात्र, महापौर रवी लांडगे यांचे छायाचित्र नावापुरते ठेवण्यात आले आहे. त्यांची संपूर्ण माहिती, संपर्क क्रमांक व मेल आयडी देण्यात आलेला नाही. त्यामुळे महापौरांना संपर्क कसा करायचा हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचे छायाचित्र व माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे माहिती व तंत्रज्ञान विभाग अद्याप प्रशासकीय राजवटीतून बाहेर पडले नसल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेचा डिजिटल कारभार हवेत

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा डिजिटल कारभार 1 एप्रिल 2025 पासून सुरू झाला आहे. दैनंदिन तसेच, संपूर्ण कामकाज संगणकावर होते. पेपरलेस कारभाराला सुरुवात करण्यात आली आहे. त्याबद्दल महापालिका प्रशासनाला पुरस्कारही मिळाला आहे. असे असताना पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रे व आवश्यक माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत नसल्याबद्दल प्रशासनाचा गतिमान कारभाराचा निष्काळजीपणा पुन्हा समोर आला आहे.

विभागप्रमुखांची दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची जुनाट छायाचित्रे

संकेस्थळावर महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांचे छायाचित्र, नाव, संपर्क क्रमांक आणि मेल आयडी दिला जातो. मात्र, काही विभागप्रमुखांची माहिती अपूर्ण आहे. करसंकलन, मध्यवर्ती भांडार, उद्यान, अग्निशमन, कार्यशाळा, निवडणूक आदी विभागाच्या प्रमुखांची नावे नाहीत, तर काही ठिकाणी छायाचित्र, संपर्क क्रमांक व मेल आयडी नाही. अनेक विभागप्रमुखांची छायाचित्रे 10 ते 15 वर्षांपूर्वीची आहेत. त्यामुळे आता त्यांची ओळख छायाचित्रातून पटवणे अवघड झाले आहे. परिणामी, अधिकाऱ्यांची जुनी छायाचित्रे पाहून नागरिकांची फसगत होत आहे. सध्याच्या युगात डिजिटल मीडिया क्षणाक्षणाला अपडेट होते. असे असताना महापालिका प्रशासन स्वत:च्या कार्यशैलीत सुधारणा करत नसल्याचे या कामकाजावरून स्पष्ट होत आहे. महापालिकेकडे स्वत:चे दोन ते तीन छायाचित्रकार असताना विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांचे ताजे छायाचित्र मिळत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT