Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC NQAS Certificate: पिंपरी-चिंचवडच्या तीन आरोग्य केंद्रांना एनक्यूएएस राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरण्याचा मान, आरोग्य सेवांवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव, जिजामाता आणि नेहरूनगर या तीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार (एनक्यूएएस) राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. हे मानांकन मिळवणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे.

या प्रमाणपत्रामुळे वैद्यकीय विभागाच्या गुणवत्तापूर्ण सेवांची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली आहे. नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांच्या विश्वासार्हतेलाही अधिक बळ मिळाले आहे. एनक्यूएएस हे संक्रमण नियंत्रण, क्लिनिकल केअर, रुग्ण हक्क, रुग्णालय व्यवस्थापन व सेवा सुधारणा अशा महत्त्वपूर्ण निकषांवर आधारित असते. या सर्व निकषांची पूर्तता करत संबंधित केंद्रांनी आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत आपला उच्च दर्जा सिद्ध केला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य सुविधा केंद्रांना हे यश मिळवून देण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे व शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. कोमल बनसोडे आणि संपूर्ण पथकांने सातत्यपूर्ण प्रयत्न केले. डॉ. छाया शिंदे व डॉ. शैलजा भावसार यांचे सहकार्य लाभले.

सर्व आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता, सेवा-सुविधा व बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या प्रक्रियांना जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि भारत सरकारच्या मानकांनुसार काटेकोरपणे अंमलात आणले जाते. नियमित निर्जंतुकीकरण, प्रतीक्षालयांची स्वच्छता, ओपीडी व्यवस्थापन व सुरक्षित उपचार वातावरणामुळे महापालिकेच्या आरोग्य सुविधांवर नागरिकांचा विश्वास वाढत आहे.

आरोग्य केंद्रांना मिळालेले यश अभिमानास्पद

भारत सरकारतर्फे मिळालेले राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र (एनक्यूएएस) हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य सेवेत सातत्याने होत असलेल्या सुधारणा व गुणवत्तेच्या बांधिलकीचे द्योतक आहे. महापालिकेच्या आरोग्य सुविधा केंद्रांनी मिळवलेले हे यश संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद आहे, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

नागरिकांना उच्च दर्जाची सेवा

महापालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळालेले राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र हे वैद्यकीय विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांना उच्च दर्जाची, सुरक्षित व रुग्ण-केंद्रित सेवा देण्याचा आमचा संकल्प यामुळे अधिक दृढ झाला आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT