Child Safety On Bike Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Child Safety: मुलांच्या आनंदासाठी जीव धोक्यात? दुचाकीवर उलट दिशेने बसवण्याचा पालकांचा निष्काळजीपणा चिंताजनक

शाळा सुटण्याच्या वेळी शहरात धोकादायक प्रवासाचे चित्र; वाहतूक पोलिसांचा इशारा — नियम पाळा, मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शाळा सुटण्याची वेळ... रस्त्यावर वाहनांची गर्दी... अशातच धक्कादायक दृश्य म्हणजे दुचाकीच्या मागील बाजूस त्यांचा लहानगा विरुद्ध दिशेकडे तोंड करून सुरू झालेला प्रवास... अशा प्रकारच्या प्रवासाचा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असला, तरी त्या आनंदामागे असलेला धोका अनेक पालकांच्या लक्षात येत नाही. हौसेपायी मुलांचा जीव धोक्यात घालण्याचा हा प्रकार चिंतेचा विषय ठरत आहे.

शहरातील विविध भागांत शाळा सुटण्याच्या वेळेत वारंवार एकच चित्र दिसून येते. अनेक पालक आपल्या मुलांना दुचाकीवर पाठीमागे विरुद्ध दिशेने बसवून नेताना दिसतात. तर, काही ठिकाणी मुले दोन्ही बाजूंना पाय सोडून, तर काही ठिकाणी सीटच्या टोकावर तोल सांभाळत उभारलेली दिसून येतात. पालकांना किंवा मुलांना ते आनंदाचे वाटत असले, तरी वास्तवात हा प्रकार धोकादायक ठरू शकतो.

नेमका धोका

दुचाकी वळण घेताना वाहनाचा तोल एका बाजूस असतो. त्यावेळी अचानक वाहनास ब्रेक लावल्यावर शरीर पुढे किंवा बाजूस जास्त प्रमाणात झुकू शकते. अशा वेळी विरुद्ध दिशेकडे तोंड करून बसलेल्या मुलाला वाहनाच्या हालचालीचा अंदाजच येत नाही. त्यामुळे त्याचा तोल जाण्याची शक्यता अधिक असते. अचानक घसरणे, वाहनावरू खाली पडणे किंवा मागून येणाऱ्या वाहनाच्या धडकेत सापडण्याचा धोका उद्भवू शकतो. काही सेकंदांचा निष्काळजीपणा आयुष्यभराची वेदना ठरू शकतो.

आनंद घ्या, पण..सुरक्षिततेच्या चौकटीत

पालकांनी मुलांचा हट्ट काही अंशी पूर्ण करणे चुकीचे नाही. मात्र, त्यासाठी त्यांच्या जीवाशी खेळणे योग्य ठरू शकत नाही. लहान मुलांना नेहमी वाहन ज्या दिशेने जाते तिकडे व्यवस्थित बसवून, संरक्षणात्मक साधनांसह प्रवास करणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना लहानपणापासूनच वाहतूक शिस्त आणि सुरक्षित प्रवासाची सवय लावणे गरजेचे आहे.

हौस नाही, सुरक्षिततेला प्राधान्य द्या!

मुलांना नेहमी वाहनाच्या दिशेनेच व्यवस्थित बसवणे गरजेचे आहे. उलट दिशेने किंवा सीटच्या टोकावर बसवणे धोकादायक ठरू शकते. अचानक ब्रेक किंवा वळणाच्या वेळी धोका वाढतो. लहान मुलांना योग्य आकाराचे हेल्मेट वापरण्याची सवय लावा. मोबाईल, रील किंवा फोटोसाठी वाहन चालवताना कोणताही स्टंट करणे घातक ठरू शकते. वाहतूक नियमांचे पालकांनी स्वतः पालन करणे गरजेचे आहे. पालकांचे वर्तनच मुलांसाठी पहिला धडा असतो. अचानक हालचाल किंवा उभे राहण्यापासून त्यांना रोखा.

रील संस्कृतीचा परिणाम

अलीकडच्या काळात सोशल मीडियावरील रील्स, व्हिडीओ आणि वेगळेपणा दाखविण्याच्या नादात अनेक चुकीच्या गोष्टींचे अनुकरण होताना दिसते. मुलाला विरुद्ध दिशेकडे तोंड करून वाहनावर बसवणे, त्याचे व्हिडीओ काढणे किंवा त्याला मजा येते, म्हणून असे कृत्य करताना दिसत आहे. प्रवासप्रसंगी योग्य जबाबदारी व खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. वाहतूक नियम हे केवळ दंडासाठी नसून जीव वाचवण्यासाठी आहेत. प्रत्येक पालकाने जबाबदारीने वाहन चालवून मुलांना सुरक्षित पद्धतीने प्रवास घडवून आणणे आवश्यक आहे. रस्त्यावर आम्हांला असे आढळून आल्यास योग्य ती कारवाई करत असतो.
अमित डोळस, वरिष्ठ वाहतूक पोलिस, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT