पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 नगरसेवकांव्यक्तिरिक्त आणखी दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेतील नगर सचिव विभागात बुधवार (दि. 4) दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सत्ताधारी भाजपा कोणत्या 7 जणांना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून कोणत्या 3 जणांना संधी मिळणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
महापालिकेत एकूण 128 जागी नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील दोन जागा हा बिनविरोध निवडून आल्या आहेत. महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भाजपाने सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे 84 नगरसेवक आहेत. तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग््रेासचे 37, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 6 नगरसेवक आहेत. नगरसेवक संख्याबळानुसार सत्ताधारी भाजपाचे 7 आणि राष्ट्रवादी काँग््रेासकडून 3 जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार आहे. महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा झाल्यानंतर लगतच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्याचा नियम आहे. त्यानुसार 13 मार्च रोजीच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे.
त्यासाठी स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची शिफारस करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना केली आहे. ती नावे सोमवार (दि.2) पर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्या दिवशी स्वत: आयुक्त हजर नसल्याने बुधवार (दि. 4) गटनेत्यांच्या शिफारशीने नावे सादर करण्यात सांगण्यात आले आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज नगरसचिव विभागात दुपारी तीन ते सायंकाळी 6 या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग््रेासकडून कोणाला संधी दिली जाणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्या पदासाठी आर्थिक हितसंबंधही जपले जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, 13 मार्च महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीचा समावेश करण्यासाठी बुधवारर्यंत ती नावे देणे आवश्यक आहे. त्यास विलंब झाल्यास स्वीकृत नगरसेवकांची निवडीचा विषय लांबणीवर पडू शकतो.
अर्जासोबत खंडीभर कागदपत्रे जोडण्याची सक्ती
स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्जासाोबत पक्षाच्या गटनेत्याशी शिफारस आवश्यक आहे. तसेच, स्वत:चे प्रतिज्ञापत्र, दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र, पडताळणी पत्र, शौचालय वापराबाबत स्वयं प्रमाणपत्र, विशेष ज्ञान किंवा अनुभवाचा तपशील किंवा पुरावा, पाच वर्षाचे अनुभवाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार यादीत नाव असल्याचा दाखला आदी अनेक कागदपत्रे उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे नसल्यास अर्ज अवैध ठरू शकतो.
एका वर्षासाठी पद?
महापालिका निवडणुकीत माघार घेणारे, बंडखोरी न करणारे, पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करणारे, दुसऱ्या पक्षात आलेले, पराभूत झालेले, माजी नगरसेवक, निष्ठावंत आणि जुने पदाधिकारी स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. तसेच, पडद्यामागे राहून पक्षाला मदत करणारे बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, शिक्षणसमाट, निवृत्त अधिकारी, कलाकार, प्रशिक्षक आदींनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षाच्या श्रेष्ठींना गळ घातली आहे. इच्छुकांची संख्या भरमसाट असल्याने भाजपाने पाच वर्षांऐवजी एक किंवा सव्वावर्षासाठी स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा फॉर्मुला निश्चित केला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने तो फॉर्मुला ठरविल्यास पंचवार्षिकेत तब्बल 40 ते 50 जण स्वीकृत नगरसेवक पद भूषवू शकतात. तसे, प्रत्यक्षात झाल्यास महापालिकेतील तो नवा विक्रम ठरेल.
दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत अर्ज स्वीकृती
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी 5 ऐवजी 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. सत्तारूढ व विरोधी गटनेत्यांच्या शिफारशीसह उमेदवारी अर्ज बुधवारी (दि. 4) दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत आयुक्त स्वीकारणार आहेत, असे महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.