पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली त्या धोरणाचा आढावा घेण्यात आला. अधिक सक्षम, व्यवहार्य व नागरिकांना दिलासा देणारी पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. धोरण लागू झाल्यानंतर शहरात रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाहन पार्क करता येणार नाही. त्याबाबत चर्चा करण्यात आली.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे सोमवारी (दि.3) झालेल्या या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शहर दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार, अधिकारी व सल्लागार उपस्थित होते.
बैठकीत यापूर्वीच्या पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीत आलेल्या अडचणी, त्रुटी, त्यामागील कारणे तसेच, त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या व प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन पार्किंग व्यवस्थेचे पुनर्नियोजन करण्यासाठी नवीन धोरण आवश्यक असल्याचे मत पदाधिकार्यांनी व्यक्त केले.
रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करणे, नागरिकांना सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे, व्यापारी भाग, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रमुख चौकांमध्ये नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उभारणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अधिकार्यांनी पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण केले. शहराच्या विविध भागांतील पार्किंगची सद्यस्थिती, उपलब्ध जागा, भविष्यातील गरजा आणि नियोजनाबाबत आवश्यक सूचना व प्रस्तावही सादर करण्यात आले.
दहा क्षेत्रीय कार्यालयानुसार दहा विभागात पे अॅण्ड पार्क
शहरातील दहा क्षेत्रीय कार्यालयानुसार पे अॅण्ड पार्क धोरण राबवले जाणार आहे. त्या-त्या विभागातील पे अॅण्ड पार्कचे दर क्षेत्रीय समितीला ठरवता येणार आहेत. त्याचे नियंत्रण व देखरेख क्षेत्रीय अधिकार्यांकडे असणार आहे. त्यामुळे त्या धोरणाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होईल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
शहरात व्यवहार्य पार्किंग व्यवस्था उभारणार
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध व कार्यक्षम बनविण्यासाठी प्रभावी पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. नागरिकांना सोयीस्कर, सुरक्षित व सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांचा कार्यक्षम वापर करणे आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देण्यात येत आहे. व्यवहार्य पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.
शहर सुधारणा समिती, स्थायी समिती, सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी
नवीन पार्किंग धोरण प्रथम शहर सुधारणा समितीसमोर सादर केले जाणार आहे. त्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेनंतर ते सर्व सर्वसाधारण सभेसमोर सादर केले जाणार आहे. धोरण तसेच, वाहन शुल्कास मंजुरी मिळाल्यानंतर दहा क्षेत्रीय कार्यालयानुसार वेगवेगळी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष संपूर्ण शहरात पे अॅण्ड पार्क योजना राबवली जाणार आहे.
रस्त्यांवरील पार्किंग असणार महाग
वर्दळीच्या रस्त्यावर (ऑनरोड) वाहन पार्क करण्याचे दर हे दुप्पट असणार आहेत. तर, मुख्य रस्त्यांपासून 50 मीटर ते 100 मीटर अंतरावरील ऑफसाईड पार्किंग झोनचे दर हे अल्प असणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन पार्क करण्यासाठी महाग व स्वस्त असा पर्याय उपलब्ध राहणार आहे. दिवसभर वाहन पार्क करण्याठी वेगळे झोन असणार असून, त्याचे दर अल्प असणार आहेत. त्यासाठी मासिक पासची व्यवस्था केली जाणार आहे. देशभरातील प्रमुख शहरातील धोरणाचा अभ्यास करून शुल्क दर निश्चित करण्यात आले आहेत.