

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ४ ऑगस्ट या चार महिन्याच्या कालावधीत एकूण ५५६ कोटी ८४ लाख ३४ हजार ७२९ रुपयांचा मालमत्ताकर जमा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ५१२ कोटी रुपयांचा भरणा हा ऑनलाईन माध्यमातून करण्यात आला आहे.
मालमत्ताकर भरण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन सुविधेला मोठी पसंती दिली आहे. महापालिकेच्या ५५६ कोटींचा मालमत्ताकर वसूल झाला असून, त्यापैकी ५१२ कोटी ७७ लाख ९८ हजार ७०८ रुपये ऑनलाईन माध्यमातून जमा झाला आहे. ४४ कोटी ६ लाख ३६ हजार २१ रुपये ऑफलाईन माध्यमातून जमा झाले आहेत.
रोखीद्वारे २३ कोटी ८५ लाख ७० हजार १२२ रुपये, धनादेशाद्वारे १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ५७२ रुपये आणि डिमांड ड्राफ्टद्वारे (डीडी) १ कोटी ७६ लाख ९८ हजार ३२७ रुपये जमा झाले आहेत. शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जागांसह ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत.
त्यापैकी ४ लाख ७३ हजार मालमत्ताधारकांनी बिलाचा भरणा केला आहे. सर्व मालमत्ताधारकांना वेळेत मालमत्ताकराची बिले वाटण्यात आली आहेत. नागरिकांचा डिजिटल माध्यमावरील वाढता विश्वास दिसून येतो. ज्या मिळकतधारकांनी अद्याप मालमत्ताकर भरला नाही, तो त्यांनी तात्काळ भरावा, असे आवाहन आयुक्त सचिन पवार यांनी केला आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालकत्ताकर भरा
पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ताकराचे वेळेवर संकलन अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्याप मालमत्ताकर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता कर भरून शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.