Malnutrition Children Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Malnutrition Children: स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये २५५६ बालके कुपोषित; अंगणवाडी सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

३६१ अंगणवाड्यांमधील २३ हजार ८९८ बालकांची तपासणी; अतिरिक्त पोषण आहार आणि आरोग्य तपासणीवर भर देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवडसारख्या स्मार्ट सिटीमध्ये कुपोषित बालकांची संख्या वाढत चालली आहे. शहरामध्ये 361 अंगणवाड्यांमध्ये ० ते 6 वयोगटातील २३ हजार ८९८ बालके आहेत. अंगणवाडी आणि इतर लोकवस्तीमध्ये जावून अंगणवाडी सेविकांकडून केलेल्या सर्वेक्षणात १६३९ बालके कुपोषित आढळली आहेत. तर, उंचीनुसार कमी वजन असलेली ९१७ बालके आढळली आहेत. शहरात अशी एकूण २५५६ कुपोषित बालके आढळली असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

अतिरिक्त पूरक आहाराची गरज

महाराष्ट्र शासनाने पोषण अभियानांतर्गत कुपोषित बालकांचे प्रमाण २.० ने कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. शहरातील कुपोषित बालकांची आकडेवारी पाहता याचे प्रमाण १०.६९ टक्के इतके आहे. त्यामुळे शहरात कुपोषण कमी करण्यासाठी अतिरिक्त पूरक आहार, तपासणीवर जास्त भर द्यावा लागणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहराच्या विविध भागात एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत शासनामार्फत 361 अंगणवाड्या चालविल्या जातात. अंगणवाडीमध्ये येणारी मुले ही आर्थिक दुर्बल घटकातील, बिगारी काम करणारे, हातावरचे पोट असणार्‍या कुटुंबांतील आहेत. शासनाकडून येणारा पोषण आहार मुलांपर्यत योग्य प्रकारे पोहचविण्यामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असते. अंगणवाडीमध्ये येणार्‍या सर्व मुलांना शासनाकडून पोषण आहार पुरविला जातो. हा आहार त्यांना अंगणवाडीमध्येच खाऊ घातला जातो. आहारातील पोषण मूल्य वाढवून मुलांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचे काम अंगणवाडीच्या माध्यमातून केले जाते.

प्रत्येक अंगणवाडीमध्ये नागरी बाल विकास केंद्र

केंद्र शासनाच्या निधीतून राज्यात ग्रामीण भागात ग्रामबाल विकास केंद्र योजना राबविण्यात येते. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील लहान बालकांच्या कुपोषणावर प्रभावीपणे मात करण्यासाठी ही केंद्र उभारली आहेत. पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्यसेवा पुरविणे या दोन्ही महत्त्वाच्या बाबी आहेत. केंद्रांअतर्गत पूरक पोषण आणि आरोग्य सेवा या दोन्ही एकत्रितपणे पुरविल्या जातात. शहरामध्येदेखील कुपोषणमुक्तीसाठी नागरी बालविकास केंद्र प्रत्येक अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहेत.

अंगणवाडीमध्ये दिला जाणारा आहार

अंगणवाडीमध्ये मुलांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचा पोषण आहार दिला जातो. गव्हाची लापशी, मुरमुरा लाडू, भात, तांदळाची खिचडी, शेंगदाणा लाडू, उसळ, राजगिरा लाडू, व्हेज पुलाव, नाचणी लाडू आदी आहार दिला जातो.

पोषण आहाराच्या नोंदीसाठी पोषण ट्रॅकर अ‍ॅप

अंगणवाडी सेविका पारंपरिक पद्धतीने सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनांच्या नोंदी, लसीकरण यासह दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवण्यात येतो. या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. सरकारच्या पोषण अभियानाअंतर्गत पोषण ट्रॅकर हे अ‍ॅप गरोदर, स्तनपान देणार्‍या महिलांना पुरवल्या जाणार्‍या सेवेचा ऑनलाईन रेकॉर्ड ठेवण्यासाठी सरकारने अंगणवाडी कर्मचार्‍यांना दिले आहे.

कुपोषित बालके म्हणजे काय?

व्यक्तीला आहारात पुरेसे पोषण मिळत नसेत तर त्याला कुपोषित म्हटले जाते. वजन आणि उंची या दोन्हीबाबतीत अपेक्षित बदल होत नाहीत. वर्तनमध्ये बदल जसे की विलक्षण चिडचिडे, सुस्त किंवा चिंताग्रस्त दिसणे, केस आणि त्वचेच्या रंगात बदल अशा मुलांना कुपोषित बालकांच्या यादीत टाकले जाते. सध्या बालविकास प्रकल्पाअंतर्गत कुपोषित बालकांचे चार प्रकारचे वर्गीकरण केले जाते. यामध्ये बालकाच्या उंचीनुसार वजन खूप कमी असणे, बालकाच्या उंचीनुसार वजन मध्यम कमी असणे, तीव्र कमी वजनाचे बालक आणि मध्यम कमी वजनाचे बालक असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

पूर्वी फक्त अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांचे वजन आणि उंची घेऊन त्यानुसार ते कुपोषित आहे की नाही हे ठरविले जात होते. आता पोषण ट्रॅकर ॲपनुसार जी मुले अंगणवाडीमध्ये येत नाहीत, त्यांचेही सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे आकडे वाढल्याचे दिसत आहे. ० ते ३ वयोगटातील बालकांना एनर्जी न्युट्रीशन्स फूड दिले जाते. शासनाकडून पोषण आहारामध्ये बदल करण्यात आला आहे. आता पूर्वीपेक्षाही जास्त पौष्टीक आणि पूरक आहार दिला जाणार आहे.
सुरेश टेळे, बालविकास प्रकल्प अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT