World Best Schools Prize 2026 Pudhari
पिंपरी चिंचवड

World Best Schools Prize 2026: कासारवाडीच्या महापालिका शाळेला जागतिक सन्मान; ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल्स प्राईज 2026’मध्ये नवोपक्रम पुरस्कार

वाचन संस्कृती व ग्रंथालय उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; ४,००० पुस्तकांपर्यंत वाढलेले ग्रंथालय ठरले विशेष आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी या शाळेची ब्रिटन येथील टी - 4 एज्युकेशन संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईजेस 2026 मध्ये नवोपक्रम या श्रेणीत हा सन्मान प्राप्त झाला आहे. सध्याच्या खासगी इंग्लिश मीडीयमच्या जमान्यात पालिका शाळांचे यश शहरासाठी अभिमानास्पद आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके निवडण्याचे स्वातंत्र्य देणे, शाळेमध्ये समृद्ध ग्रंथालय उभारणे आणि वाचन चळवळ संपूर्ण समुदायापर्यंत पोहोचविणे या उपक्रमांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत शाळेने आपल्या ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या १,००० वरून ४,००० पेक्षा अधिक केली. शाळेत दररोज वाचन तास सुरू करण्यात आला. या उपक्रमातून १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःची पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. तसेच शाळेचा वार्षिक साहित्य महोत्सव 'कथाकार' हजारो विद्यार्थी, पालक आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणत आहे.

शाळेने सुरू केलेली 'पुस्तकांचे गाव' ही संकल्पना आज कासारवाडी परिसरात वाचन संस्कृतीचा सामुदायिक उत्सव बनत आहे. अनेक कुटुंबांनी घरगुती ग्रंथालये उभारण्यास सुरुवात केली असून वाचन हा समुदायाच्या जीवनाचा भाग बनत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या भागीदारीत चालणाऱ्या या शाळेने विकसित केलेले वाचन संस्कृती मॉडेल आज ५० हून अधिक मनपा शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १,३८,००० पुस्तके, ६७७ ग्रंथालय कपाटे, आणि २०,००० हून अधिक विद्यार्थी, ५०० शिक्षक व ५० मुख्याध्यापक या चळवळीशी जोडले गेले आहेत.

या ऐतिहासिक यशानिमित्त २५ जून रोजी पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या जागतिक यशाचा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये वाचन संस्कृतीच्या प्रवासाचे सादरीकरण, जागतिक घोषणेचे थेट प्रक्षेपण, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला.

आमचे उद्दिष्ट पुरस्कार जिंकणे नव्हते. प्रत्येक मुलाला पुस्तकांवर प्रेम करण्याची संधी मिळावी हा आमचा प्रयत्न होता. हा सन्मान विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संपूर्ण कासारवाडी समुदायाचा आहे.
परिजात प्रकाश (मुख्याध्यापक, छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT