Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Live Streaming: पिंपरी-चिंचवड महापालिका सभेचे लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू; पारदर्शक कारभाराला मिळणार बळ

१५ जूनपासून बंद असलेले थेट प्रक्षेपण २ सप्टेंबरपासून पूर्ववत; विरोधकांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय, नगरसेवकांकडून सोशल मीडियावर रिल्सची धूम

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण अचानक बंद करण्यात आले होते. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली होती. तसेच, न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला होता. अखेर सत्ताधार्‍यांनी 2 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेपासून सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू केले आहे. त्या निर्णयाचे शहरात स्वागत केले जात आहे. परिणामी, महापालिका सभागृहात पारदर्शक कारभार केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महापालिकेत भाजपची दुसर्‍यांदा सत्ता आल्यानंतर सत्ताधार्‍यांकडून सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करण्यात आले होते. मात्र, सभेत भाजपचे नगरसेवक विरोधात बोलत असल्याने, वायफळ चर्चा होत असल्याने, प्रभागातील लहान-लहान समस्या सभागृहात मांडल्या जात असल्याने तसेच, महापौरांचा सन्मान राखण्याकडे काही नगरसेवकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे सत्ताधारीच अडचणीत सापडले होते. तसेच, सत्ताधार्‍यांतील समन्वयांचा अभाव, चुकीचे निर्णय घेणे. संपूर्ण उपसूचना न वाचतात, मंजुरी देणे. अनुभवी विरोधकातील अनुभवी नगरसेवकांकडून होणारे हल्ले आदींवरून सत्ताधार्‍यांमधील संभ्रम उघड होत होता. सत्ताधार्‍यांच्या नियमबाह्य कामकाजावर विरोधकांकडून बोट ठेवले जात होते. लाईव्ह प्रक्षेपणामुळे सत्ताधारीच अडचणी येत असल्याचे तसेच, लहान लहान चुका उघड होत असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले होते. याविषयीचे वृत्त 'पुढारी' १४ जून रोजी प्रसिद्ध केले होते.

संसद तसेच, विधानसभा अधिवेशनाचे कामकाज लाईव्ह केले जाते. महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता राहावी व नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सभागृहातील चर्चा, निर्णय व कामकाजाची माहिती थेट मिळावी, यासाठी लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा महत्त्वाची आहे. मात्र, 15 जून 2026 पासून ही सुविधा अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या कामकाजापासून दूर ठेवले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी भाजपवर टीका केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा आयुक्तांना दिला होता.

अखेर, दोन सप्टेंबरपासून सर्वसाधारण सभेचे कामकाजाचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांना सभेचे कामकाज पाहता आले. यामुळे नागरिकांना महापालिकेच्या सभागृहातील कामकाज थेट पाहता येत आहे. परिणामी, महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.

उच्च न्यायालयात याचिका दाखल

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण पूर्ववत करावे अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा कायदेशीर नोटीस देऊन दिला होता. त्यानंतरही सभेचे कामकाज ऑनलाईन सुरू न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन, प्रशासनाने सभेचे कामकाज लाईव्ह सुरू केले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सांगितले.

पदाधिकारी, नगरसेवकांकडून सोशल मीडियावर रिल्स

सभेचे कामकाज लाईव्ह सुरू झाल्याने महापालिकेचे पदाधिकारी तसेच, नगरसेवकांनी आपल्या भाषणाचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर रिल्स पोस्ट केले आहेत. त्यातून आपली प्रसिद्धी करून घेतली जात आहे. प्रभागातील समस्येचा मुद्दा सभागृहात मांडला. प्रभागातील प्रश्नांबाबत आपण सजग आहोत. त्या सोडण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे सांगत रिल्स टाकल्याने त्याला नागरिकांचे लाईक्स मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT