

वडगाव मावळ: चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला असून, या घटनेच्या निषेधार्थ टाकवे बुद्रुक येथे नागरिकांनी एकजूट दाखवत मूक मोर्चा, निषेध सभा आणि बाजारपेठ बंद ठेवून तीव्र संताप व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी टाकवे बुद्रुक येथे एका दोन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी बाळू नामदेव वाचवले या आरोपीस अटक केली असून, या घटनेचे तीव्र पडसाद मावळ तालुक्यात उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर टाकवे बुद्रुक येथे खंडोबा चौकात झालेल्या निषेध सभेला महिला, युवक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी देवा गायकवाड, शिवाजी असवले, सदानंद पिलाणे, अनिल मालपोटे, मुनावर अत्तार, अंकुश आंबेकर, संध्या असवले, सुवर्णा असवले, बाळासाहेब मालपोटे, आदिनाथ जांभुळकर, अक्षय ननवरे, जितेंद्र ननवरे, यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
निषेध सभेनंतर येथून मूक मोर्चा काढण्यात आला. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेत निघालेल्या या मोर्चातून नागरिकांनी आपल्या संतापाला वाट करून देतानाच पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्याची ठाम भूमिका व्यक्त केली. मोर्चानंतर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
“चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली. आरोपीला अटक झाल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानण्यात आले; मात्र केवळ अटक करून प्रकरण थांबता कामा नये. तपास वेगाने पूर्ण करून सक्षम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. गावात तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.
ग्रामस्थांची एकजूट अभिमानास्पद !
या घटनेतील आरोपी स्थानिक असून, पीडित कुटुंब हे परप्रांतीय आहे. परंतु, ही घटना अत्यंत निर्दयी व लाजिरवाणी असल्याच्या भावनेतून टाकवे ग्रामस्थांनी एकत्र येत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून मूक मोर्चा व निषेध व्यक्त केला. सामाजिक भावनेतून टाकवे ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा
या गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून उपलब्ध सर्व भक्कम पुरावे संकलित करावेत. आरोपीला कायद्यातील कोणतीही पळवाट मिळू नये, यासाठी तपास यंत्रणेने विशेष दक्षता घ्यावी. तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबीयांना आवश्यक कायदेशीर मदत, पोलिस संरक्षण तसेच मानसिक आधार उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.