पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज शहरवासीयांना समजावे म्हणून सत्ताधारी भाजपने सभा कामकाजाचे ऑनलाईन प्रक्षेपण सुरू केले होते. मात्र, ऑनलाईन सभा कामकाजामुळे सत्ताधारीच अडचणीत येत असल्याने तो प्रकार बंद करण्याची नामुष्की सत्ताधार्यांवर ओढवली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 15) होणार्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रेक्षपण (लाईव्ह) केले जाणार नाही.
महापालिकेत दुसर्यांदा भाजपची सत्ता आली आहे. नवे कारभारी महापालिकेत आल्याने सर्वसाधारण सभेचे कामकाज ऑनलाईन केले जावे, अशी मागणी वाढली होती. त्याची दखल घेऊन महापौर रवी लांडगे यांनी आयुक्तांना सभा कामकाजाचे थेट प्रेक्षपण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सभागृहाचे कामकाज ऑनलाईन करण्यात येत आहे. सर्वसाधारण सभेचे कामकाज शहरवासीयांना समजावे म्हणून सत्ताधारी भाजपने तो निर्णय घेतला होता.
सभेच्या थेट प्रेक्षपणामुळे नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते तसेच, नगरसेवकांच्या समर्थकांना नगरसेवक काय बोलले हे समजत होते. तर, कोणता नगरसेवक कोणत्या विषयावर कसा बोलत आहे, हे ही संपूर्ण शहरासमोर येत होते. तसेच, सभा कामकाजात नगरसेवक किती सहभाग घेतो, हे नागरिकांसह मतदारांना कळत होते. काही नगरसेवक थेट प्रेक्षपणातील स्वत:चा स्वतंत्र व्हिडीओ तयार करून त्याचे रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता.
ऑनलाईन सभेमुळे भाजप पदाधिकारी अडचणीत
ऑनलाईन सभेमुळे फायदा होण्यापेक्षा अनेकदा सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी अडचणीत सापडले होते. त्यामुळे महापौरांवर थेट दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली होती. थेट प्रक्षेपणाचा प्रकार सत्ताधार्यांच्या अंगलट आला आहे. त्यामुळे सत्ताधार्यांनी सभा कामकाज ऑनलाईन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यापुढे सभा ऑनलाईन पाहता येणार नाही.
सोमवारच्या सभेचे थेट प्रक्षेपण नाही
अर्थसंकल्प सादर करण्यात येणार होता. त्यामुळे सर्वसाधारण सभेचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. नियमित होणार्या मासिक सर्वसाधारण सभेचे थेट प्रेक्षपण केले जाणार नाही. येत्या सोमवारी (दि. 15) होणार्या सर्वसाधारण सभेचे ऑनलाईन प्रेक्षपण केले जाणार नाही, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.