पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा केली असली तरी, प्रत्यक्षात हे प्रकल्प कागदावरच रखडल्याचे समोर येत आहे. चार्जिंग स्टेशन्सअभावी ई-वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असून, पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्दिष्टाला फटका बसत आहे. या कामासाठी पालिकेकडून तीनवेळा निविदा काढूनही त्यास अद्यापही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेकडून अद्यापपर्यंत एकही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेले नाही.
निविदाप्रक्रियेला प्रतिसाद नाही
या प्रकल्पासाठी महापालिकेने तीन निविदा काढल्या; परंतु ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. भविष्यात ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल की नाही, या भीतीपोटी कंपन्यांनी जोखीम घेण्याचे टाळल्याने निविदेस अल्पप्रतिसाद मिळाला. तिसऱ्या निविदेला दिल्ली येथील कंपनीला टेंडर दिल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार, नियोजित जागांवर चार्जिंग पॉईंट उभारण्याचे अधिकार कंपनीला देण्यात आले; परंतु पुन्हा ही निविदा रद्द करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून निविदा रद्दचे प्रकार घडत असल्याने हे चार्जिंग स्टेशन्स प्रत्यक्षात सुरू होतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरात चाळीस हजारांहून अधिक ईव्ही
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे चाळीस हजारांहून अधिक ईलेक्ट्रीक वाहने असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे.
प्रस्तावित चार्जिंग पॉईंट
ॲाटो क्लस्टर, दुर्गा टेकडी, ट्रान्सपोर्टनगर परिसर, चिखली आरटीओ, बर्ड व्हॅली, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल परिसर, भोसरी-लांडेवाडी, भक्ती-शक्ती, बजाज ॲटो, एचए परिसर, संत तुकारामनगर, कासारवाडी, कोकणे चौक, राजर्षी शाहू उद्यान परिसर, सावित्रीबाई फुले उद्यान.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी विशेष सुविधा
प्रवासी वाहतूक करणाऱ्या मईव्हीफसाठी ई चार्जिंग स्टेशनची सुविधा महापालिका उभारत आहे. या वाहनांना शहरात चार्जिंग करून पुढचा प्रवास विनाअडथळा करता यावा. हा उद्देश यामागे असला तरी पॉईंट उभारणीच्या विलंबामुळे वाहनधारकांना चार्जिंग समस्येला सामोरे जावे लागत आहे.
शहरात चार्जिंग स्टेशन्स्ा उभारण्यासाठी पालिकेकडून तीनदा निविदा काढण्यात आली; परंतु योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने निविदा रद्द करण्यात आली. नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.अनिल भाल साकळे, सह शहर अभियंता, पिं. चिं.