

पिंपरी: नऊ वर्षांनंतर महापालिकेच्या निवडणूक झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात नवख्या नगरसेवकांची संख्या वाढली आहे. उत्साह दांडगा असल्याने सभागृहातील प्रत्येक विषयावर नगरसेवक मत प्रदर्शन करत आहेत. आपल्या प्रभागातील समस्या मांडण्यासाठी धडपडत आहेत. परिणामी, सभागृहाचे कामकाजाचा वेळ नाहक वाढत असल्याने पदाधिकारी तसेच, अनुभवी नगरसेवक वैतागले आहेत. नवख्यासह सर्व नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
तब्बल नऊ वर्षांच्या खंडानंतर महापालिकेची निवडणूक झाली. निवडणुकीत भाजपाची सलग दुसऱ्यांदा सत्ता आली. तर, राष्ट्रवादी काँग््रेास पुन्हा विरोधी बाकावर बसली आहे. एकूण 128 पैकी निम्मापेक्षा अधिक नगरसेवक हे पहिल्यांचा निवडून आले आहेत. सभागृहात नवखे नगरसेवक प्रत्येक विषयावर बोलत आहेत. प्रभागांतील समस्या कोणत्याही परिस्थिती सभागृहात मांडण्यासाठी ते धडपडत आहेत. त्या माध्यमातून आपल्याला प्रभागात वेगवेगळी कामे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात असल्याचे हे दर्शवले जात आहे.
प्रत्येक विषयाला नगरसेवक बोलत आहेत. आपल्या प्रभाग तसेच, शहरातील समस्यांचा पाढा वाचत आहेत. काही नगरसेवक तसेच, नगरसेविका थेट कागदावर लिहून आणून सभागृहात आपले मत मांडत आहेत. एका नगरसेवकाने एकादा मुद्दा काढला तर, सर्वच नगरसेवक त्याबाबत बोलण्यासाठी हात वर करतात. विषय मंजुर किंवा तहकूब झाल्यानंतरही उत्साही नगरसेवक मत प्रदर्शन करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सभागृहाचा वेळ अधिक वाया जात आहे. विषयाला धरून नसलेली वायफल चर्चाही होत असल्याने पदाधिकारी तसेच, अनुभवी नगरसेवक अक्षरश: वैतागले आहेत. नवख्यांसह सर्वच नगरसेवकांना सभागृह कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत जाहीरपणे व्यक्त करण्यात येत आहे.
सभागृहातील वक्तत्व आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी
सभागृहात बोलण्यासाठी नगरसेवक सातत्याने उभे राहत आहेत. सभागृहात केलेल्या वक्तव्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून त्याचे क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यासाठी सभागृहातील नागरिकांच्या कक्षात खास कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात आली आहे. काही खासगी एजन्सीचीही मदत घेतली जात आहे. त्या व्हिडीओला नगरसेवकांच्या समर्थकांसह नागरिकांकडून मोठ्या संख्येने लाईक्स मिळत आहेत. त्या माध्यमातून नगरसेवक आपली प्रसिद्ध करून करून घेत आहेत. छायाचित्र व व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी महापालिका सभागृहात तीन ते चार छायाचित्रकार फिरत असल्याचे दिसून आले. सभागृहाचे कामकाज सुरू असताना इतक्या संख्येने छायाचित्रकार थेट सभागृहात बिनधास्तपणे सर्वत्र फिरत असल्याने अनुभवी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
सभागृह नेतेच वैतागले
प्रत्येक विषयाला हात वर करून नगरसेवक उभे राहत आहेत. आपले मत मांडत आहेत. काही नगरसेवक वारंवार बोलत होते. त्यामुळे चर्चा नाहक फरकटते. असा प्रकार शुक्रवारच्या (दि.13) सर्वसाधारण सभेत पुन्हा दिसून आला. त्यामुळे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे अक्षरश: वैतागले होते. त्यांनी अनेकदा विषयाला धरून बोला, अशी सूचना केली; मात्र त्याला कोणी दाद दिली नाही. अखेर, त्यांनी सर्वच नगरसेवकांना प्रशिक्षणांची गरज असल्याचे जाहीर करून टाकले.