पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होऊन तीन दिवस उलटूनही अद्याप उमेदवारी अंतिम न झाल्याने सर्वच जण व्हेंटीलेटरवर आहेत. भल्या भल्याचे तिकीट फायनल न झाल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट मिळते आणि कोणाचे तिकीट कापले जाते, याची शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
निवडणुकीची आचारसंहिता 15 डिसेंबरपासून लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवार (दि. 23) पासून सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्यास सुरूवात होऊन तब्बल तीन दिवस उलटले तरी, अद्याप सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादी निश्चित झालेली नाही. तसेच, प्रमुख एकाही पक्षाने अधिकृतपणे एकही उमेदवार जाहीर केला नाही.
अद्याप, भल्या भल्याचे तिकीट फायनल झालेले नाही. वरचे पदाधिकारी निर्णय घेणार आहेत, यादी प्रदेशाकडे पाठवून दिली आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सचिवाची स्वाक्षरी झालेली नाही, यादी लवकरच जाहीर होईल, काळजी करु नका, तयारीला लागा, अशी उत्तरे शहराध्यक्षांसह स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच, कोअर कमिटीच्या सदस्यांकडून दिली जात आहेत.
भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आता युती होऊ द्या, असे उत्तर इच्छुकांना देण्यात येत आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, बहुजन वंचित आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आदी प्रमुख पक्षांकडून आघाडी झाल्यानंतर उमेदवारी यादी जाहीर करू असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे सर्वच प्रबळ इच्छुक व माजी नगरसेवक व्हेटिलेटरवर आहेत.
उमेदवार फोडाफोडीमुळे दररोज विविध प्रभागांतील गणिते बदलत आहेत. माजी नगरसेवकांसह पदाधिकारी, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी व सून थेट दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत. तसेच, राजकीय पटावर वेगाने नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून सावध पावले टाकली जात असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.=
शहरातील मोठ्या प्रमाणात फोडाफोडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा तसेच, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. ती संख्या मोठी आहे. फोडाफोडी अद्याप सुरूच आहे. माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचा मुलगा निहाल पानसरे यांनी गुरुवार (दि. 25) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या फोडाफोडी सत्रामुळे त्या पक्षातील जुने व निष्ठावंत इच्छुक बंड करण्याच्या तयारीत आहे. त्यांना बंडखोरी करण्यास वेळ मिळू नये म्हणून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याचे सांगितले जात आहे.
आम आदमी पार्टीने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजे 15 नोव्हेंबरला एकूण 15 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. तसेच, समाजवादी पार्टीने 11 उमेदवारांची यादी 22 डिसेंबरला प्रसिद्ध केली आहे. या दोन पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, डावे लोकशाही, पुरोगामी पक्ष व संघटना स्वतंत्रपणे आपले उमेदवार निवडणुकीसाठी उतरविणार आहेत.
पक्षाला सुरक्षित असलेल्या प्रभागामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज माजी नगरसेवकांना व इच्छुकांना उमेदवारीबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्यानुसार चार जणांचे पॅनेल जाहीर करून प्रभागात एकत्रित प्रचाराला सुरूवातही करण्यात आली आहे. मोठ्या उत्साहात प्रचार सुरू असून, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. त्यांनी जोरात प्रचार सुरू केल्याने दुसऱ्या पक्षातील उमेदवार तिकीट कधी जाहीर होण्याची याची वाट पाहत आहेत. त्यांची अस्वस्थता वाढत आहे.
प्रभाग क्रमांक : 16
रावेत, मामुर्डी, किवळे