पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रचाराचा उत्साह अक्षरश: शिगेला पोहचला होता. प्रचाराचा मंगळवार (दि. 13) शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. येणार येणार आपलाच उमेदवार विजयी होणार... विजयी भव...असे आशीर्वाद देत, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण करत, मोठा जल्लोष करत प्रचाराच्या तोफा थंडावल्या.
महापालिकेच्या 128 पैकी 126 जागांसाठी 32 प्रभागात निवडणूक मैदानात राजकीय पक्ष, संघटना, बंडखोर व अपक्ष असे तब्बल 692 उमेदवार आहेत. मतदान गुरूवार (दि. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होत आहे. उमेदवारांसह त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी 3 जानेवारीपासून प्रचाराचा धडाका लावला होता. पदयात्रा, रॅली, रोड शो, गाठीभेटी, बैठका, मेळावा, गुप्त बैठका तसेच, कोपरा सभा व जाहीर सभांद्वारे सर्व उमेदवारांनी प्रभागात प्रचाराचा धुराळा उडवला.
या प्रचार रणधुमाळीची मंगळवारी या प्रचाराची सांगता झाली. सकाळी सुरू झालेल्या वाहन रॅली व पदयात्रेद्वारे संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यात आला. त्यात हजारोंच्या संख्येने महिला, नागरिक व युवा वर्ग सहभागी झाले होते. डोक्यावर फेटे, गळ्यात मफलर, शर्टावर व हातात चिन्ह तसेच, झेंडा घेतलेले कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांचा आकर्षक पेहराव नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. अनेक ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. काही ठिकाणी जेसीबीतून फुले उधळण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी उमेदवाराचे औक्षण केले. काही भागांत रांगोळ्याचा पायघड्या घालण्यात आल्या होत्या. फटाके फोडण्यात आले. मार्गावरील मुख्य चौकात कार्यकर्त्यांनी एकच जयघोष करत विजयाचा दावा केला. विजयी होणार, झिंदाबाद, झिंदाबादच्या घोषणा देत समर्थकांनी उमेदवारांला खांद्यावर उचलून घेऊन विजयांचा विश्वास व्यक्त केला. त्या वेळी वातावरण भारावून गेले होते. त्यात महिला व युवतीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सायंकाळी प्रचार थांबल्याने उमेदवारांचे संपर्क कार्यालय ओस पडले होते. त्या ठिकाणी बॅनर्स, झेंडे, टोप्या व कटआऊट, चिन्ह, पत्रकांचा अरक्षश: खच पडला होता.
झेंडे, बॅनर्स, जाहिराती हटल्या
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकांकडून मंगळवारी सायंकाळनंतर सर्व उमेदवारांच्या संपर्क कार्यालयावरील फलक, चिन्ह, झेंडे व बॅनर्स हटविण्यात आले. शहरभरात लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहिराती काढण्यात आल्या. शहरभरातील वीजेचे खांब, दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स, डीपी बॉक्स, झाडे, सीमाभिंत आदी ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स व चिन्ह महापालिकेच्या पथकांकडून हटविण्यात येत आहेत.
आवाज थांबल्याने हायसे
सायंकाळनंतर प्रचार थांबल्याने कर्कश आवाजात घोषणा देणारे रिक्षा व टेम्पो परिसरात फिरणे बंद झाले. सकाळपासून स्पीकरवर फिरणाऱ्या रिक्षा येणे बंद झाल्याने परिसरात विशेषत: दाट लोकवस्ती, रुग्णालय, हाऊसिंग सोसायटी, वसतीगृह, पाळणाघर आदी भागांतील रहिवाशांनी हायसे व्यक्त केले. त्यामुळे सर्वच परिसरात शांतता जाणवत होती. रॅली, रोड शो, पदयात्रा नसल्याने रस्ते मोकळे झाले होते. परिणामी, मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर कोंडी न होता वाहतूक रहदारी सुरळीतपणे सुरू झाली होती.
अखेरच्या दिवशीही अजित पवारांची बॅटिंग
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी पिंपरी-चिंचवड शहरात अक्षरश: ठाण मांडली होती. त्यांनी दहापेक्षा अधिक जाहीरसभा घेतल्या. अखेरच्या दिवशी मंगळवारी त्यांनी नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात रोड शो घेतला. नवी सांगवी येथे एक कोपरा सभा आणि भोसरी व दापोडी अशा दोन ठिकाणी जाहीरसभा घेत अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याने शहरात त्यांची चर्चा रंगली आहे.
शहरात नेत्यांनी डागल्या तोफा
शहरात भाजपा नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकुर्डीतील एक जाहीरसभा तसेच, भोसरीत रोड शो घेतला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराची सुरुवात केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, पर्यटन मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सभा झाली. तसेच, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीही सभा, मेळावे व बैठका घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शहरभरात जाहीर सभा व रोड शो घेत शहर ढवळून काढले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल यांनीही बैठका घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, युवा नेते आमदार रोहित पवार, खासदार नीलेश लंके, खा. अमोल कोल्हे यांनीही सभा व मेळावे घेतले. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलवर सभा घेतली. तसेच, उद्योग मंत्री उदय सामंत यांची सभा झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांसाठी युवा नेते आदित्य ठाकरे, नेत्या सुषमा अंधारे, नितीन बानगुडे पाटील, आमदार सचिन अहिर आदींचे मेळावे झाले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची जाहीरसभा झाली. तसेच, राज्यस्तरीय नेते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार व आमदारांच्या शहरभरात सभा झाल्या.