

लोणावळा: लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक मागील महिन्यात पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाला पूर्ण बहुमत प्राप्त झाले असून, त्या खालोखाल भाजपा तदनंतर काँग््रेास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व नंतर अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. संख्या बळानुसार राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाला दोन स्वीकृत नगरसेवक, भाजपाला एक स्वीकृत नगरसेवक पद जाणार असल्याने कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक काळात राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी ज्यांना प्रत्यक्ष उमेदवारी देता आली नाही, अशा अनेकांना आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात स्वीकृत नगरसेवक करण्याचे आश्वासन दिले. तर अनेक जणांनी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या यादीमध्ये असलेल्या अनेकांपैकी प्रथम कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्कंठा वाढली आहे.
स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देताना पक्षाच्या आदेशाचे पालन करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिली जाणार की जवळच्या कार्यकर्त्याला संधी दिली जाणार, हेदेखील लवकरच समजणार आहे. राष्ट्रवादी काँग््रेासचे 16 नगरसेवक निवडून आले असून, पक्षाकडून मंगेश मावकर या तरुण नगरसेवकाला गटनेते म्हणून संधी देण्यात आली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग््रेासचा गट स्थापन केला आहे. संख्याबळानुसार त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाच्या दोन जागा मिळणार आहेत.
भाजपाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, भाजपाचा गट नेता कोण होणार यावरून मतमतांतरे असल्यामुळे गट स्थापना रखडली आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनीदेखील नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे. काँग््रेास पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आले असून, त्यामध्ये देखील एकमत नसल्याने गट तयार झालेला नाही. इतरांची अवस्था देखील तशीच असल्याने 13 जानेवारी रोजी होणाऱ्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचा उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक घोषित होणार आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची सर्व पक्षीय भूमिका
लोणावळा नगर परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. 27 पैकी तब्बल 23 नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून, नगराध्यक्ष देखील नवीन निवडून आले आहेत. जनतेने दिलेला कौल सर्व पक्षांनी स्वीकारला असून निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून नवीनच चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे. जे यापूर्वी निवडून आले आहेत किंवा ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली मात्र जनतेने त्यांना नाकारले आहे, अशा चेहऱ्याचे राजकीय पुनर्वसन करण्याऐवजी निवडणूक काळात तसेच इतर वेळी कायम पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी, अशीदेखील मागणी अनेकांनी केली आहे.