पिंपरी: तब्बल 9 वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक झाली आहे. बहुमत मिळवून भाजपाने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समिती सभापती तसेच, शिक्षण, विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा आदी विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी संबंधितांची दालने रिकामी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच, बंद दालने साफ करून घेण्यात येत आहेत. तब्बल चार वर्षांनंतर ती बंद दालने खुली होणार आहेत.
मुदतीमध्ये निवडणुका न झाल्याने महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. तेव्हापासून आयुक्त हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार पाहत आहेत. तब्बल 4 वर्षे प्रशासकीय राजवट सुरू आहे. फेबु्रवारी 2017 च्या निवडणुकीनंतर तब्बल 9 वर्षांनंतरच्या 15 जानेवारी 2026 ला निवडणुकीसाठी मतदान तर, 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागला आहे. भाजपाने सलग दुसऱ्यांदा निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. भाजपाचे कारभारी महापालिकेचे कामकाज पुढील पाच वर्षे सांभाळणार आहेत, त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेते, गतनेते, स्थायी समिती सभापती तसेच, शिक्षण, विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा आदी विषय समिती सभापती निवडीच्या प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. या पाधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन व वाहन असते.
महापालिका भवनातील महापौर व इतर बंद असलेले दालने स्वच्छ करून घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय राजवट राजवटीतील पदाधिकाऱ्यांची दालन अधिकाऱ्यांना देण्यात आली होती त्या दालनातून अधिकारी आपले कामकाज करत होते. ती दालने रिकामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यात उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, तसेच किरण गायकवाड, अतुल पाटील आदींना पदाधिकाऱ्यांचे दालन रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, पदाधिकाऱ्यांच्या दालनासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वीय सहाय्यक, मुख्य लिपिक, लिपिक, वाहचालक, महिला व पुरुष शिपाई यांची नेमणूक केली जात आहे. एकूण 35 कर्मचारी नेमले जात आहेत.
महापौर कोण होणार, याची उत्सुकता
शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. महापौर पद हे अनुसूचित जाती (एससी) वर्गासाठी राखीव असल्याचे सांगितले जात आहे. एस.सी.च्या वीस जागांपैकी भाजपाचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी पहिल्यांदा कोणाला संधी मिळते, महापौर कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापौर निवडीनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात
प्रशासकीय राजवट लवकरच थांबणार, महापौर निवड फेब्रुवारीत महापौर पदासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलवली जाणार आहे. महापौर निवडीनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून महापौर, उपमहापौर पदाची निवड केली जाईल. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रत्येक पक्षाकडून नगरसेवकांची यादी देऊन पक्षनेता व विरोधी पक्षनेता निवडला जाईल. त्यानंतर विविध विषय समिती सदस्य व अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होईल. फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर पदाची निवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहेत.
पदाधिकारी निवडीच्या प्रकियेची तयारी
महापौरपदाचे आरक्षण झाल्यानंतर महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समिती सभापती तसेच, शिक्षण, विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा आदी विषय समिती सभापती निवडीची प्रकिया करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी केली जात आहे. बंद दालने स्वच्छ करून घेतली जात आहेत. तसेच, पदाधिकारी व दालनासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागास कळवले आहे, असे महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.