

खराळवाडी: पुणे-मुंबई महामार्गावरील खराळवाडी येथे विठ्ठल-रखुमाई मंदिर ते दूरसंचार कार्यालयासमोर काही अंतरावर डांबर टाकण्यासाठी रस्ता जेसीबीच्या साह्याने डांबर उखडून काढले आहे. या गोष्टीला साधारण पंधरा ते वीस दिवस होऊन गेले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांना येथून प्रवास करताना अपघाताचा धोका संभवत आहे. काही दुचाकी घसरून पडलेल्या आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला सांगून येथील रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे.
पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खराळवाडी परिसरातील उखडून ठेवलेला रस्ता किंवा खराळवाडी रस्त्यावर खडे पडलेले हे बुजवण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम अपुरे राहिले असल्यामुळे अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर घसरुन जखमी झाले आहेत. तरी हे रखडलेले डांबरीकरण तात्काळ चालू करण्याची मागणी वाहनचालकांनी महापालिका बांधकाम विभागाकडे केली आहे.
पहिल्या टप्प्यात खराळवाडी गावठाण ते मध्यवर्ती भागातील रस्ते दुरुस्ती केली; परंतु काही भागात नकळत काही रस्ता दुरुस्ती करण्याचे राहून गेले आहेत. येस बँकेपासून ते दूरसंचार कार्यालयासमोरील रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही. या परिसरात खराळवाडी उप पोस्ट कार्यालय, विठ्ठल-रखुमाई मंदिर, बडोदा बँक, पुढे एचए सोसायटी, हापकीन महामंडळ, वल्लभनगर बसस्थानक, महाविद्यालय आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कामगारांची, नोकरदार व विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने या रस्त्यावरून मोठ्या संख्येने वाहतूक रहदारी असते. तरी महापालिकेने निवडणुकीपूर्वी हा टप्पा पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, पुणे-मुंबई महामार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महामार्गावर रास्ता उधडून ठेवून उर्वरित डांबरीकरणाचे काम अद्याप सुरू केले नाही.
या रखडलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या खराळवाडी परिसरातील नागरिकांनी महापालिका बांधकाम विभागाच्या आळशी कारभारावर तीव नाराजी व्यक्त करत विभागाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या आठवड्यात या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला. हा रस्ता पुढे कासारवाडी, फुगेवाडी, दापोडीपर्यंतचे काम केले आहे. परंतु खराळवाडी येथील काम अपूर्ण राहिलेले आहे. अचानक काम थांबले, तरी मागील एक महिन्यात खराळवाडीतील इतर ठिकाणी रखडलेली कामे पूर्ण करताना दिसत आहेत. मात्र, विठ्ठल रखुमाई मंदिर ते दुरसंचार कार्यालयासमोर या मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या महामार्गावर प्रवास करणारे दुचाकीस्वार उधडलेल्या रस्त्यावर दुचाकी वाहने घसरुन पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक जीव मुठीत धरून संथ गतीने वाहन चालवतात. अनेक दुचाकीस्वार आतापर्यंत दैव बलवत्तर म्हणून बचावले आहेत. उदडलेल्या रस्त्यावर प्रवास करताना दुचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
हिरामण बाबर, वाहनचालक