

पिंपळे गुरव: जुनी सांगवी येथील जयराज सोसायटीसमोरील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्लास्टिक पिशव्या घरगुती ओला-सुका कचरा सर्रास रस्त्यालगत फेकला जात असून, या ठिकाणी तीव दुर्गंधी पसरली आहे. कचरा वेळेत न उचलल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच विदारक होत चालली असून, संपूर्ण परिसराला डंपिंग ग््रााऊंडचे स्वरूप आले आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली केवळ घोषणांची आतषबाजी केली जात असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत स्वच्छतेच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे संतापजनक चित्र येथे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सांगवी परिसराची मॉडेल वॉर्ड म्हणून निवड करण्यात आली होती. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधांचा आदर्श नमुना म्हणून या वॉर्डकडे पाहिले जात होते. मात्र, सध्याची अवस्था पाहता मॉडेल वॉर्ड ही संकल्पनाच फसवी ठरल्याचा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात भटकी कुत्री, डुक्कर, मांजरे तसेच मोकाट जनावरे व गाई, म्हशी मोठ्या संख्येने जमा होत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी नागरिकांना कचरा टाकू नये, यासाठी सुशोभीकरण करण्यात आले आहे त्याच ठिकाणी मोकाट जनावरांनी ठाण मांडले असून, तो परिसर अक्षरशः जनावरांचा अड्डा बनला आहे. अन्न शोधताना हे प्राणी रस्त्यावर येत असल्याने वाहनचालक व पादचारी यांच्यासाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, डास-माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कचरा संकलन, वाहन अनियमितपणे येत असून, या ठिकाणी येथे कचरा टाकू नये, असे कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्थानिकांसह बाहेरून येणारे लोकदेखील याच ठिकाणी बिनधास्तपणे कचरा टाकत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाची ही बेफिकिरी आणि हलगर्जीपणा नागरिकांच्या संयमाचा अंत पाहत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तात्काळ सुरू करावी, अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा देण्यात येत आहे. प्रशासनाने आता तरी डोळे उघडून मस्मार्ट सिटीफच्या गोंडस जाहिरातींपेक्षा जमिनीवरची वास्तव स्थिती पाहावी, अशी संतप्त भावना जुनी सांगवीतील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सांगवी मॉडेल वार्ड म्हणून निवड झाली होती. पण रोज सकाळी घराबाहेर पडताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. लहान मुले आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक नागरिक
सदर ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकला जाऊ नये, यासाठी त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. नागरिकांच्या वर्तणुकीत हळूहळू सकारात्मक बदल होत आहे. जे नागरिक कचरा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेसदेखील कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी सोमवारपासून रात्रपाळीसाठी एक पथक नेमण्यात येणार आहे.
संदीप राठोड, आरोग्य निरीक्षक, ह क्षेत्रीय कार्यालय