Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Budget 2026-27: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2026-27 अर्थसंकल्प शनिवारी सादर

आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीपुढे मांडणार अर्थसंकल्प; यंदा मालमत्ताकर व पाणीपट्टी दरात वाढ नाही

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या शनिवारी (दि.28) आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी होणाऱ्या पहिल्या सभेत हा अर्थंसंकल्प मांडण्यात येणार आहे. तशी तयारी महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या काळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

महापालिकेतील मागील चार वर्षांची प्रशासकीय राजवट महापौर निवडीनंतर 6 फेबुवारी 2026 पासून संपुष्टात आली. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर स्थायी समितीची स्थापना ही महत्त्वाची प्रक्रिया सुरू आहे. स्थायी समिती सदस्य नियुक्तीनंतर शनिवारी अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होत आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष निवडणूक न झाल्यामुळे फेबुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, नियमाप्रमाणे फेबुवारी महिन्याच्या आत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष निवड व त्याच दिवशी समितीची विशेष सभा घेऊन अर्थसंकल्प सादर होणार आहे.

स्थायी समितीच्या या विशेष सभेचे विषयपत्र तयार करण्यात आले आहे. महापालिकेच्या मधुकर पवळे सभागृहात शनिवारी सकाळी अकराला स्थायी समिती अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यानंतर दुपारी बाराला अर्थसंकल्पाची विशेष सभा होईल. या सभेत आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीपुढे हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने झालेल्या स्थायीच्या अध्यक्षांना पहिल्याच बैठकीत अर्थसंकल्पावर निर्णय घ्यावा लागणार आहे. तर, यंदाचा अर्थसंकल्प फुगीर नसेल. तो महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मुदतीमध्ये निवडणूक न झाल्याने 12 मार्च 2022 ला महापालिका बरखास्त झाली. त्यानंतर 13 मार्च 2022 प्रशासकीय राजवट लागली. प्रशासकीय राजवटीत सलग तीन अर्थसंकल्प प्रशासकांकडून सादर करण्यात आले. आर्थिक नियोजन, विकासकामे आणि निधीवाटपाचे निर्णयही प्रशासकांच्या माध्यमातूनच घेतले जात होते. मात्र, या वेळी आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समिती आणि नंतर सर्वसाधारण सभेद्वारे नगरसेवकांना बदल करता येणार आहेत.

यंदा मालमत्ताकरात वाढ नाही

यंदा मालमत्ताकर, पाणीपट्टी दरात वाढ करण्यात आलेली नाही. सन 2025-26 चा मूळ 6 हजार 256 कोटी 39 लाख रुपयांचा तर, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या निधीसह 9 हजार 675 कोटी 27 लाख रुपयांचा अर्थसंकल्प तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी सादर केला होता.

अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण

अर्थसंकल्प तयार करण्याचे कामकाज पूर्ण झालेले आहे. आयुक्त यांच्या निर्देशानुसार अर्थसंकल्प सादरीकरणासाठी स्थायी समितीची विशेष सभा शनिवारी दुपारी बाराला घेण्यात येत आहे, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT