Ayushman Bharat Health Centre Pudhari
पिंपरी चिंचवड

Ayushman Bharat Health Centre: पिंपरी-चिंचवडमध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर बंद अवस्थेत; डॉक्टर नसल्याने नागरिकांची गैरसोय

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्यवर्धिनी केंद्रे डॉक्टरांच्या अभावामुळे बंद अवस्थेत आहेत. लाखो रुपये खर्चून उभारलेली केंद्रे सुरू न झाल्याने नागरिकांना उपचारांसाठी वणवण भटकावे लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

मनीषा थोरात पिसाळ

मोशी: केंद्र सरकारच्या 'आयुष्मान भारत' योजनेचा मुख्य भाग असलेली आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत व दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने शहरात ठिकठिकाणी 'आरोग्यवर्धिनी केंद्रे' (आयुष्मान आरोग्य मंदिर) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आले. परंतु, या केंद्रांमध्ये उपचार देण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने ही वैद्यकीय केंद्रे कुलूप बंद अवस्थेत आहेत. लाखो रुपये खर्चून या केंद्रांच्या इमारती आणि पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्या धूळ खात पडून आहेत.

साने चौकातील आरोग्यवर्धिनी केंद्राची अवस्थाही यापेक्षा वेगळी नसून, इमारतीला कुलूप असल्याने परिसरातील नागरिकांना उपचारांसाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच कुदळवाडी येथील नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरदेखील काही डॉक्टरविना बंद आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना केवळ साधे उपचारच नव्हे, तर तब्बल १२ प्रकारच्या सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा मोफत मिळणे अपेक्षित आहे.

यामध्ये माता आरोग्य सेवा आणि प्रसूतीपूर्व काळजी, नवजात अर्भक देखभाल व लसीकरण, बाल व किशोरवयीन आरोग्य तपासणी, कुटुंब नियोजन व समुपदेशन, तसेच टीबी, मलेरिया आणि कुष्ठरोगासारख्या संसर्गजन्य आजारांवरील उपचारांचा समावेश आहे. याशिवाय हल्ली वाढलेले असंसर्गजन्य आजार जसे की रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांची मोफत तपासणी व औषधोपचार, डोळ्यांचे व चष्म्याच्या नंबरची तपासणी, कान-नाक-घसा संबंधी किरकोळ आजार, दातांची प्राथमिक काळजी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धापकाळातील विशेष आरोग्यसेवा, आपत्कालीन ट्रॉमा केअर आणि मानसिक ताणतणावावरील समुपदेशन यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सुविधा या एकाच छताखाली मिळायला हव्यात.

मोठ्या रुग्णालयांतील रुग्णांचा ताण होणार कमी

प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, आरोग्यवर्धिनी केंद्र हा पालिकेचा नव्हे, तर शासनाकडून मंजूर असलेला प्रकल्प आहे. तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे वेतनही शासनच देते, महापालिका फक्त त्यांची नेमणूक करते. मोठ्या रुग्णालयांवरील रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारतात ही योजना सुरू केली असून, तिथे १२ प्रकारच्या सामान्य आरोग्य सेवा दिल्या जातात. सध्या ६५ ठिकाणी काम सुरू झाले असून, उर्वरित ठिकाणीही काही दिवसांत काम सुरू होणार असल्याचे सांगितले.

आरोग्यवर्धिनी केंद्रे कधी होणार सुरू

आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्तीच न झाल्याने या सर्व दर्जेदार आणि मोफत सुविधांपासून सर्वसामान्य जनता वंचित राहिली आहे. शासनाने योजना उत्तम आखली आणि इमारतीही उभ्या केल्या; परंतु वैद्यकीय अधिकारी नसल्याने साने चौकासह शहरातील इतर बंद असलेली ही आरोग्यवर्धिनी केंद्रे नक्की कधी सुरू होणार आणि तिथे कायमस्वरूपी आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या सर्व आरोग्य सुविधा कधी पूर्ववत केल्या जाणार, याचीच वाट आता सर्वसामान्य पाहत आहेत.

पूर्वी ७९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती, पण योग्य उमेदवार मिळाले नव्हते आणि नंतर आचारसंहिता लागू झाल्याने नवीन जाहिरात देता आली नाही. मात्र, कालच ही यादी अंतिम करून प्रसिद्ध करण्यात आली असून, आजपासून लोक रुजू होऊ लागले आहेत आणि पुढील १५ दिवसांत सर्व व्यवस्था सुरळीत होईल. मुख्य कार्यालयातून एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे, जो कामावर देखरेख ठेवेल आणि सेवा सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देईल.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
कोणतेही तांत्रिक कारण पुढे न करता प्रशासनाने आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. यामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होऊन गोरगरीब रुग्णांना जलद, तत्पर आणि माफक दरात उपचार मिळतील.
यश साने, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT