

लोणावळा: ग्राहकांची कोणतीही परवानगी न घेता व पूर्वकल्पना न देता बसवले जात असलेल्या स्मार्ट मीटरच्याविरोधामध्ये लोणावळा शहरात सोमवारी (दि. 22) व्यापारी संघटना व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोणावळा व परिसरातील सर्व लहान-मोठे दुकाने, हॉटेल्स बंद ठेवत महावितरणचा निषेध नोंदविला.
अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे
पावसाचा शिडकावा सुरू असतानादेखील नागरिकांनी त्याची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र जमत महावितरण कार्यालयाचा गलथान कारभार व स्मार्ट मीटरसक्ती याचा निषेध नोंदविला. या ठिकाणी आलेले महावितरणचे राजगुरुनगर येथील मुख्य कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच, स्मार्ट मीटरबाबत आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. केंद्राकडून हे मीटर आले असल्याचे सांगून याबाबत वरिष्ठांशी चर्चा करू, असे उत्तर दिल्याने सर्व राजकीय पक्षांकडून या वेळी संताप व्यक्त करण्यात आला.
नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिल
संपूर्ण लोणावळा शहर ज्या मागणीसाठी बंद आहे व सर्वसामान्य नागरिक ज्या गोष्टीचा निषेध नोंदवत आहे त्याची दखलदेखील महावितरण घेत नसल्याचे दिसले. आगामी काळात ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवल्यास स्मार्ट मीटर जागीच फोडले जातील व संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी यांनादेखील चांगला चोप दिला जाईल, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर राजकीय पक्षांनी महावितरण अधिकाऱ्यांना सुनावले आहे. या वेळी नागरिकांनी सांगितले, की स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी त्यांना दीड हजार रुपये बिल येत होते. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आता पहिल्या महिन्यामध्ये साडेनऊ हजार रुपये, दुसऱ्र्या महिन्यात 24 हजार रुपये व या महिन्यात 26 हजार रुपये बिल आले आहे. याबाबत राजगुरुनगरचे मुख्य कार्यकारी अभियंता काळू माळी यांना विचारणा केली असता याबाबत चौकशी करू, असे त्यांनी सांगितले. मात्र, हे बिल भरले नाही म्हणून ग्राहकाची वीज मात्र बंद करण्यात आली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती एवढी मोठी रक्कम कशी भरणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आंदोलन तीव्र करण्याचा निषेध
स्मार्ट मीटर सदोष असल्यामुळे वीजचोरी रोखले जाणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. तर, मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वीजबिले कशी येत आहेत, असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित करण्यात आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर दिले जात नाहीत. केवळ आम्हाला आदेश आहे, म्हणून आम्ही स्मार्ट मीटर लावतोय अशी उत्तरे दिली जात आहेत. नागरिकांच्या संतापाचा अंत पाहू नका; अन्यथा हे आंदोलन तीव्र रूप धारण करेल व त्यानंतर होणाऱ्या परिणामाला महावितरणचे अधिकारी जबाबदार राहतील, अशा शब्दात सर्वच राजकीय पक्षांच्या अधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
‘स्मार्ट मीटरमधील दोष दूर करावे’
स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा बिले येऊ लागली आहेत. सर्व ठिकाणावरून याबाबत संताप व्यक्त केला जात असताना महाराष्ट्र शासन मात्र याबाबत कोणती भूमिका घेत नसल्यामुळे महावितरणच्या विरोधामध्ये सुरू असलेला रोष आता शासनाच्याविरोधातदेखील जाऊ लागला आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी व या स्मार्ट मीटरमधील दोष दूर करावेत, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली. या आंदोलनामध्ये व्यापारी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आदी राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटना व सर्वसामान्यांना नागरिक सहभागी झाले होते.
मुख्य अभियंत्याने घेतला काढता पाय
आंदोलनादरम्यान मनसेने आक्रमक भूमिका घेतली व स्मार्ट मीटरला विरोध दर्शवला. तसेच, स्मार्ट मीटर बसवल्यामुळे ज्या वीजग्राहकाचे बिल काही पटीने वाढले आहे, त्यांना बिलासह समोर आणले होते. या वेळी मुख्य कार्यकारी अभियंता यांच्यासमोर उभे करत प्रश्नांचा भडीमार सुरू केल्यानंतर संबंधित अधिकारी केशव काळू माळी यांनी याबाबत चौकशी करतो एवढेच सांगत काढता पाय घेतला. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले बिल न भरल्यामुळे त्या वीजग्राहकाची वीज बंद झाली आहे ती केव्हा सुरू होणार, याबाबत चकार शब्ददेखील काढला नाही.