पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी बोगस उपसूचनेद्वारे 52 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आणि यामध्ये नगरसेवकांसह ठेकेदारदेखील सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. समितीला सात दिवसांत अहवाल सादर करायचा होता. मात्र, गुरुवारी (दि. 16) मुदत संपल्यानंतरदेखील समितीने अहवाल सादर केला नाही.
प्रवीण जैन यांनी 70 हून अधिक कामांची बिले 20 ठेकेदारांना 30 मार्चच्या रात्री परस्पर अदा केली आहेत. ही बाब महापालिका अधिनियम 1949 मधील अंदाजपत्रकीय नियंत्रण, वित्तीय शिस्त व अधिकृत मंजुरीसंदर्भातील तरतुदीच्या उल्लंघनास कारणीभूत आहे. या प्रकरणाची स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी पुराव्यासह तक्रार केली होती. त्याची चौकशी करण्यासाठी डॉ. सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे.
चौकशी लांबणीवर पडण्याची शक्यता
या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त (क्रमांक एक) हे समितीचे अध्यक्ष आहेत. ही चौकशी सुरू असतानाच गुरुवारी (दि.16) अचानक अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर अतिरिक्त आयुक्त म्हणून कुलदीप जंगम यांची नियुक्ती झाली आहे. आता ते या चौकशी समितीचे अध्यक्ष असणार आहेत.
नवीन अधिकारी असल्याने पुन्हा नव्याने त्यांना सर्व प्रकरणाची माहिती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल लांबणीवर जाणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यावरून विरोधकांनी रान उठवले असताना सत्ताधाऱ्यांनीदेखील एकत्र येत या प्रकरणाची तातडीने चौकशी पूर्ण करण्याची मागणी लावून धरली आहे.