

वडगाव मावळ: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती पदाच्या निवडणुकीवरून घडलेल्या राष्ट्रवादी काँग््रेास संचालकांच्या राजीनामा नाट्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त झाल्याचा आदेश दिल्याने निवड झाल्यानंतर अवघ्या 21 दिवसांत सभापतींसह भाजपच्या संचालकांची घरी बसण्याची वेळ आली आहे. दरम्यान, भाजपने राष्ट्रवादीला केलेल्या धोबीपछाडनंतर आमदार सुनील शेळके यांनी मात्र भाजपवर चांगलाच पलटवार केल्याचे दिसत आहे.
तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च झालेल्या निवडणुकीत 18 संचालक निवडून आले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे 16, काँग््रेास 1 व भाजप 1 असे संख्याबळ होते. विधानसभा निवडणुकीनंतर आणखी चार संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे भाजपचे एकूण 5 संचालक झाले. तरीही 13 संचालक असल्याने राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व होते.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचेच 6 संचालक फुटले आणि भाजपचे सुभाषराव जाधव हे सभापती झाले. हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी तातडीची बैठक घेतली. यामध्ये राष्ट्रवादीच्या संचालकांनी त्वरित राजीनामे द्यावेत, अन्यथा पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा दिला होता.
पहिली बैठकही कोरमअभावी रद्द
आमदार शेळके यांचा आदेश मानून राष्ट्रवादीचे 12 व काँग््रेासचे 1 अशा 13 जणांनी आपले राजीनामे सहायक निबंधक नवनाथ अनपट यांच्याकडे सुपूर्द केले आणि बाजार समितीवर टांगती तलवार आली. यानंतर झालेली पहिली बैठकही कोरमअभावी रद्द झाली. आधीच्या सभापती, उपसभापतींनी राजीनामे द्यावे म्हणून एकवटलेले संचालक सभापती पदाच्या निवडणुकीत मात्र फुटले, त्यामुळे आगीतून उठले आणि फुफाट्यात पडले अशी गत झाली होती. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 अंतर्गत कलम 45 (1) नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून सहायक निबंधक अनपट यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश दिला आहे.
आमदार शेळकेंनी मारले एका दगडात अनेक पक्षी
दरम्यान, भाजपने डाव टाकत राष्ट्रवादीचा धोबीपछाड केला होता. भाजपच्या या डावाला अवघ्या 21 दिवसांत पलटवार करत आमदार शेळके यांनी भाजपचे संचालक, राष्ट्रवादीचे फुटलेले संचालक यांना चांगलाच धडा शिकवला असून. सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधी म्हणून किंवा पक्षाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सर्वांनाच एकप्रकारे शिस्त लावण्याचा शुभारंभ केला आहे,.त्यामुळे आमदार शेळके यांनी या माध्यमातून एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा रंगली आहे.