Pavanathadi Jatra 2026 Pudhari
पिंपरी चिंचवड

Pavanathadi Jatra 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये पवनाथडी जत्रेला उत्साहात सुरुवात; ८०० हून अधिक स्टॉल्स

सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर महिला बचत गटांच्या उत्पादनांची मोठी बाजारपेठ; प्रवेश विनामूल्य, १ मार्चपर्यंत जत्रा सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेतर्फे सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे आयोजित पवनाथडी जत्रेला बुधवारी (दि.25) उत्साहात सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी जत्रेचा आनंद घेण्यासाठी तसेच, खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जत्रा रविवार (दि.1) पर्यंत चालणार असून, प्रवेश विनामूल्य आहे.

जत्रेचे उद्घाटन आमदार शंकर जगताप व उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर रवी लांडगे यांच्या पत्नी माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर शकुंतला धराडे, भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे, शाम जगताप, आरपीआयचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वाव्हळकर, माजी पक्षनेते नामदेव ढाके व नगरसेवक तसेच, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, संदीप खोत, सीताराम बहुरे, अर्चना केरूरे व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पवनाथडी जत्रा भरवली आहे. जत्रेत 800 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यात दिव्यांग आणि तृतीयपंथी बचत गटांचेही स्टॉल आहेत. महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची चव जपणारे शाकाहारी व मांसाहारी पदार्थासह पारंपरिक पदार्थही येथे उपलब्ध आहेत. नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढील चार दिवस या जत्रेमध्ये महिलांनी तयार केलेली उत्पादने व विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. पवनाथडी जत्रा सर्वांसाठी खुली असून, प्रवेश विनामूल्य आहे. सायंकाळी सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा मराठी बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमालाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. उपायुक्त ममता शिंदे यांनी प्रास्ताविक केले. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सुत्रसंचानल केले. नगरसेविका राणी पठारे यांनी आभार मानले.

महापालिका रोजगारनिर्मिती करणार

पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी पवनाथडी जत्रा हे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे. जत्रेत सहभागी असलेल्या स्टॉलधारक महिलांनी आपला व्यवहार डिजिटल पद्धतीने करावा. जत्रेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर महापालिका भर देत आहे. शहरात भविष्यात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती कशी करता येईल, यासाठी महापालिका पुढाकार घेईल, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT