Pavana Maval MIDC Pudhari
पिंपरी चिंचवड

Pavana Maval MIDC: पवन मावळात MIDC भूसंपादनाला सुरुवात; शेतकऱ्यांना हरकतीची संधी

बऊर-करूंज परिसरात मोजणी प्रक्रिया सुरू; औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

उर्से मावळ: पवन मावळ तालुक्यातील बऊर, बाह्मणवाडी आणि करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला (दि. 12 एप्रिल) अधिकृत सुरुवात करण्यात आली. याच जमिनींची पहिली मोजणीही करण्यात आली असून, पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबविण्यात येणार आहे.

या मोजणी प्रक्रियेदरम्यान मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पार पडले. यावेळी नायब तहसीलदार गणेश तळेकर, मंडलाधिकारी शिवाजी जाधव तसेच भूमी अभिलेख विभागाचे उपअभियंता नितीन सूर्यवंशी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, ग््राामीण पाणीपुरवठा विभाग आणि कृषी विभागाचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी झाले होते. संबंधित क्षेत्रातील पायाभूत सुविधा, जलस्रोत आणि शेतीवर होणारा परिणाम याचा प्राथमिक आढावा घेण्यात आला.

दरम्यान, जमीनमालकांना येत्या 15 तारखेपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी आपल्या हरकती संबंधित कार्यालयात नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एमआयडीसी प्रकल्पामुळे या परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा असून, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांचे योग्य पुनर्वसन याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, पुढील टप्प्यात सविस्तर मोजणी, जमीन मालकांशी चर्चा आणि भरपाई संदर्भातील प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हरकतींसाठी मुदत

जमीन मालकांना येत्या 15 तारखेपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी आपल्या हरकती संबंधित कार्यालयात नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

एमआयडीसी प्रकल्प हा या परिसराच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून, शेतकऱ्यांच्या सर्व हरकती आणि सूचना गांभीर्याने विचारात घेतल्या जातील. कोणत्याही जमीनमालकावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जाईल. भविष्यात हा परिसर विकसित होत जाऊन हिंजवडीप्रमाणे आयटी व औद्योगिक केंद्र म्हणून उभा राहण्याची क्षमता आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
सुरेंद्र नवले, उपविभागीय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT