पिंपरी: कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, चांगल्या पदार्थाला वाटीभर मीठ नासवते; तसेच या भूलथापा विचारांना नासवण्याचेसुद्धा काम करतात. चुकीचे काम करणाऱ्यांच्या विचारांना मुळीच बळी पडू नका. कोण काय आरोप करते त्याकडे दुर्लक्ष करा, असे म्हणत थेट पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे- पालवे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
काळेवाडी येथील शुक्रवार (दि. 9) भाजपाच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की, आम्ही केवळ विकासावर राजकारण करणारे आहोत. आम्ही विकासाची भूमिका मांडत आलोय. गॅसच्या किमती वाढल्यामुळे विरोधकांनी रान उठवले होते.
मात्र, त्याला सरकारने सबसिडी दिली. नुसत्या थापा, फेकाफेकी आम्ही कधी केली नाही. विरोधकांकडून वेगवेगळ्या योजना जातील, अशी आरोळी उठवली होती. पण कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. आम्ही संस्कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत.
या भागातील सर्व विकासाचे मुद्दे मार्गी लावणार आहोत. वेगवेगळ्या अनेक योजना आहेत. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, या भागातील सर्व विषय आम्ही मांडू.
केंद्रातील पैसा लुबाडणे बंद झाले
गरिबांच्या कल्याणासाठी यापूर्वी विरोधकांच्या सत्ताकाळात दिल्लीतून म्हणजेच केंद्रातून आलेला 1 रुपया या आपल्या गरिबांपर्यंत येईपर्यंत केवळ 15 पैसे उरत होते; मात्र भाजपाचे सरकार आल्यावर, आम्ही त्याचा थेट गरिबांना लाभ मिळावा, यासाठी जनधन योजना सुरू केली.