अनिल तावरे
सांगवी: बारामती व फलटण तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या निरा नदीत या दोन्ही तालुक्यांतील सहकारी व खासगी प्रकल्पांतील रसायनमिश्रित सांडपाण्याने प्रदूषण वाढले आहे. यामुळे नदीच्या पाण्याला काळा रंग चढला आहे. परिणामी नदीकाठच्या भागातील नागरिकांतून अक्षरशः काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.
नदीत सोडण्यात येत असलेल्या या रसायनमिश्रित पाण्याकडे राजकीय नेत्यांसह प्रशासकीय यंत्रणेचे गेली वीस वर्षे दुर्लक्ष होत आहे. या दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जगणे मुश्किल झाले असून, शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या गंभीर प्रकरणाची कोणताही राजकीय पक्ष व प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे याबाबत नेमकी दाद मागायची कोणाकडे? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
फलटण तालुक्यातील खासगी दूध प्रकल्प, सहकारी आणि खासगी साखर कारखाने, जनावरांचा कत्तलखाना, फलटण नगरपरिषद आदी प्रकल्पांतील रसायनमिश्रित सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच थेट ओढ्यावाटे निरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सोडले जात आहे. या सांडपाण्यामुळे नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.
परिणामी नदीकाठच्या नागरिकांना घरातही राहणे मुश्किल झाले आहे. नदीकाठच्या चांगल्या जमिनी क्षारपड झाल्याने पिकांचा उत्पादन खर्चही निघत नाही. यातून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
फलटण तालुक्यातील प्रकल्पांमुळे शिरवली बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे निरावागज बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी प्रदूषित झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या दोन्ही बंधाऱ्यांच्या पाणलोट क्षेत्रातील जलचर प्राणी मृत पावल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.
हे पाणी ऑईलपेक्षाही काळे दिसत आहे. नदीकाठच्या नागरिकांना, जनावरांच्या आरोग्यावर व शेतीला मोठा धोका निर्माण झाला आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसांत या प्रदूषित पाण्याचा रंग एका दिवसात तीन वेळा बदलताना दिसतो. सकाळी हिरवा, दुपारी पिवळसर, तर संध्याकाळी काळा असा पाण्याचा रंग बदलत असतो.
आरोग्याच्या समस्या वाढल्या
शेतातील पिकांना नदीचे पाणी देताना शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटते. काही नागरिकांना रस्त्यावरून जाताना पाण्याच्या दुर्गंधीमुळे उलट्यांचा त्रास होतो. उग््रा वासामुळे लहान बालकांना विविध शारीरिक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. काहींना आरोग्यांच्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या बाबीकडे प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
बड्या राजकारण्यांचा अडथळा?
गेल्या वीस वर्षांपासून शिरवली बंधाऱ्यात फलटण तालुक्यातील राजकारण्यांच्या प्रकल्पांतील रसायनमिश्रित सांडपाणी ओढ्यावाटे थेट नदीपात्रात सोडले जाते. तेच पाणी जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे शिरवली बंधाऱ्याची गळती होऊन निरावागज बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मिसळते. या दोन्ही बंधाऱ्यांतील प्रदूषणाबाबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना निवेदने देऊनही काहीच उपयोग होताना दिसत नाही. तसेच राज्य आणि केंद्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काहीच ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे याबाबत नेमकं गौडबंगाल काय, संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नमुने नेले, पण अहवाल आला नाही
मागील तीन वर्षांपूर्वी राज्य व केंद्र शासनाच्या पातळीवर हे प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी हालचाली केल्या होत्या. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत परिसराची पाहणी केली. मात्र, त्यानंतर ना अधिकारी आले ना नेते. शेकडो वेळा निरा नदीच्या प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र, एकदाही त्याबाबतच चांगला किंवा वाईट असा अहवाल आला नाही.