Nigdi Pradhikaran Road Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Nigdi Pradhikaran Road Issue: निगडी-प्राधिकरणात खोदकामानंतर रस्ता जैसे थे; पाइपलाइन कामामुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त

अपूर्ण रस्त्यामुळे धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना; महापालिका व ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: निगडी-प्राधिकरण परिसरातील पोस्ट विभागासमोरील रस्त्यावर पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी करण्यात आलेले खोदकाम अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामानंतर रस्ता पूर्ववत न केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून, परिसरात धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभागाने पाइपलाइनचे काम सुरू केले. मात्र, खोदकाम केल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून, अनेकदा किरकोळ अपघात घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अर्धवट रस्त्यामुळे वाहतूक मंदावते.

पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात किंवा वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. पादचार्‍यांनाही या मार्गावरून चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील व्यापार्‍यांनीही अपूर्ण कामामुळे या रस्त्यामुळे ग्राहकांची ये-जा कमी झाल्याची तक्रार केली आहे.

तसेच, धुळीमुळे परिसरातील हॉटेलचालक, दुकानदारांनाही त्रास सहन करावा लागत आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशी सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षिततेची उपाययोजना नसल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.

स्थानिक नागरिकांनी संबंधित महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराने काम तातडीने पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी केली आहे. जलवाहिनीचे काम आवश्यक असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेची आणि वाहतुकीच्या सुरळीत व्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने पार पाडावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT