Post Office File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad New Post Offices: पिंपरी-चिंचवडमध्ये पाच नवीन टपाल कार्यालये सुरू होणार; नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

थेरगाव, वाकड, ताथवडे, पुनावळे आणि पिंपळे सौदागरचा समावेश; चार भागांना स्वतंत्र पिनकोड, टपाल सेवांचा विस्तार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: थेरगाव, वाकड, ताथवडे, पुनावळे आणि पिंपळे सौदागर या भागांमध्ये नवीन टपाल कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना दैनंदिन टपाल सेवा, बचत योजना, विमा सुविधा आणि विविध शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभ पद्धतीने मिळणार आहे.

थेरगाव येथे सुरू होणारे कार्यालय हे वितरण कार्यालय नसून नॉन-डिलिव्हरी पोस्ट ऑफिस असेल. येथे नागरिकांना बचत खाते उघडणे, आवर्ती ठेव, मुदत ठेव, सुकन्या समृद्धी योजना, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI) आणि पार्सल बुकिंग देशातील आणि विदेशातील तसेच इतर आर्थिक सेवा उपलब्ध होतील. मात्र, या कार्यालयामार्फत पत्र, पार्सल किंवा टपाल वितरणाचे काम केले जाणार नाही.

वाकड, ताथवडे, पुनावळे आणि पिंपळे सौदागरमध्ये वितरण सेवा

वाकड, ताथवडे, पुनावळे आणि पिंपळे सौदागर येथे प्रस्तावित टपाल कार्यालयांमधून नागरिकांना वितरणासह विविध सुविधा मिळणार आहे. या भागांमध्ये ऑनलाइन खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, पार्सल सेवा आणि ई-कॉमर्स वितरण अधिक वेगवान होणार आहे. ऑनलाइन खरेदी, बँकिंग कागदपत्रे, पासपोर्ट पडताळणी, शासकीय पत्रव्यवहार आणि विविध व्यावसायिक कामांसाठी स्वतंत्र टपाल व्यवस्था उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

स्वतंत्र पिनकोडमुळे फायदा

नवीन टपाल कार्यालयांमुळे संबंधित भागांना स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत होणार आहे. पिनकोडनिहाय वर्गीकरण अधिक अचूक झाल्यास पत्रे आणि पार्सल चुकीच्या पत्त्यावर जाण्याचे प्रकार कमी होतील. तसेच ई-कॉमर्स कंपन्यांनाही वितरण सुलभ होणार आहे. ताथवडेसाठी ४११०४७, पुनावळेसाठी ४११०८६, वाकडसाठी ४११०८८ आणि पिंपळे सौदागरसाठी ४११०८३ असे स्वतंत्र पिनकोड निश्चित केले आहेत. ताथवडे कार्यालयासाठी ४ पोस्टमनसह एकूण ९, पुनावळेसाठी ३ पोस्टमनसह १०, वाकडसाठी ५ पोस्टमनसह १२ तर थेरगावसाठी २ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंजुरी मिळाली आहे.

वाढत्या शहरीकरणात महत्त्वाचे पाऊल

पिंपरी-चिंचवडमधील वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे सौदागर आणि थेरगाव हे परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित झाले आहेत. हजारो नवीन कुटुंबे या भागांत वास्तव्यास आल्याने शासकीय आणि आर्थिक सेवांची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत नवीन टपाल कार्यालये सुरू करण्याचा निर्णय हा नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

टपाल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद, विश्वासार्ह आणि सुलभ सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नवीन कार्यालयांमुळे नागरिकांचा वेळ वाचेल, शासकीय आणि आर्थिक सेवा अधिक जवळ येतील आणि टपाल व्यवस्थेचा विस्तार अधिक प्रभावीपणे करता येईल.
संजय आढारी (उपडाकपाल, पिंपरी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT