Electric Vehicle Mechanics: इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली; कुशल मेकॅनिकची मोठी गरज

पिंपरी-चिंचवडमध्ये २९ हजार ६८१ ईव्हींची नोंद; बॅटरी, मोटर आणि कंट्रोलर दुरुस्तीच्या प्रशिक्षणातून तरुणांना रोजगाराची संधी
Electric Vehicle Mechanics
Electric Vehicle MechanicsPudhari
Published on: 
Updated on: 

बजरंग मासाळ

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना या वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या प्रशिक्षित मेकॅनिकची गरजही वाढत आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांच्या दुरुस्तीचा अनुभव असलेल्या मेकॅनिकसमोर आता इलेक्ट्रिक वाहनांच्या नव्या तंत्रज्ञानाचे आव्हान उभे राहिले आहे. बॅटरी, मोटर, कंट्रोलर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेतील बिघाड शोधून त्यांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष कौशल्याची गरज भासत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान असलेले कुशल मेकॅनिक उपलब्ध होण्याचे प्रमाण मर्यादित आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सर्व्हिसिंग क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढू लागली आहे.

Electric Vehicle Mechanics
Kasarwadi Swimming Pool: पाच महिन्यांनंतर कासारवाडीचा जलतरण तलाव सुरू; अस्वच्छता आणि सुरक्षेच्या त्रुटींमुळे नागरिकांची नाराजी

वाहनांची संख्या वाढली; सर्व्हिसिंगचा प्रश्न गंभीर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ईव्ही डॅशबोर्डवरील उपलब्ध आकडेवारीनुसार, शहरात एकूण २९ हजार ६८१ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद आहे. त्यामध्ये २७ हजार ५० दुचाकींचा समावेश आहे. यावरून शहरात इलेक्ट्रिक दुचाकींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट होते. दैनंदिन प्रवासासह व्यावसायिक वापरासाठीही इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली जात आहे. वाहनांची संख्या वाढत असताना त्यांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेली सर्व्हिसिंग व्यवस्था सक्षम असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बॅटरीची तपासणी, चार्जिंगमधील दोष, मोटरमधील बिघाड अशा तांत्रिक समस्यांसाठी प्रशिक्षित मेकॅनिकची आवश्यकता आहे.

पारंपरिक मेकॅनिकसमोर नव्या तंत्रज्ञानाचे आव्हान

पेट्रोल-डिझेल वाहनांची दुरुस्ती आणि इलेक्ट्रिक वाहनांचे सर्व्हिसिंग यामध्ये मोठा फरक आहे. पारंपरिक वाहनांमध्ये इंजिन, क्लच, गिअरबॉक्स आणि इंधन यंत्रणेवर काम करावे लागते. तर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी, मोटर, कंट्रोलर आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम महत्त्वाची असते. त्यामुळे केवळ अनुभवाच्या जोरावर या वाहनांची दुरुस्ती करणे शक्य नाही. त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. विशेषतः उच्च विद्युतदाबाच्या यंत्रणेवर काम करताना सुरक्षिततेचे नियम पाळणे, बॅटरीची तपासणी करणे आणि आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने बिघाड शोधण्याचे कौशल्य मेकॅनिकला अवगत करावे लागणार आहे.

Electric Vehicle Mechanics
Talegaon Dabhade Municipal Council: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सत्तेला वर्ष पूर्ण; विकासकामांसह नव्या नियुक्त्यांचे आव्हान

तळवडेत स्वतंत्र सर्व्हिसिंग सुविधा

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात स्वतंत्र सर्व्हिसिंग केंद्रांची गरज निर्माण झाली आहे. तळवडे परिसरात इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी स्वतंत्र सर्व्हिसिंग सुविधा सुरू होणे ही या क्षेत्रातील महत्त्वाची घडामोड आहे. अशा केंद्रांमुळे वाहनधारकांना दुरुस्तीसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होऊ शकते. त्याचबरोबर प्रशिक्षित तंत्रज्ञांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आवश्यक प्रशिक्षण, अनुभव आणि आधुनिक उपकरणांच्या आधारे तरुणांना स्वतःचा दुरुस्ती व्यवसाय सुरू करण्याचाही पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

प्रशिक्षणाची संधी; तरुणांना रोजगाराचा मार्ग

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे प्रशिक्षण घेता येत नसलेल्या तरुणांनाही या क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी प्रशिक्षणाची सुविधा ईव्ही वाहन निर्मिती कंपन्यांकडून सुरु केली जाणार आहे. या प्रशिक्षणात इलेक्ट्रिक वाहनांची रचना, बॅटरीची देखभाल, मोटर व कंट्रोलरची कार्यपद्धती, सर्व्हिसिंग आणि तांत्रिक बिघाड शोधण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. आयटीआयचे विद्यार्थी, वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणारे कारागीर तसेच रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना याचा लाभ होऊ शकतो.

Electric Vehicle Mechanics
Lonavala Bandh: अतिक्रमण कारवाईविरोधात लोणावळा बंदची हाक; व्यापारी, नागरिकांचा सोमवारी सहभाग

रोजगाराच्या नव्या संधींचे दालन

पिंपरी-चिंचवड हे वाहन उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र आहे. शहरात वाहननिर्मिती उद्योगाबरोबरच त्याला पूरक असलेल्या सेवा क्षेत्राचाही विस्तार होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे सर्व्हिसिंग, बॅटरी दुरुस्ती, तांत्रिक तपासणी आणि देखभाल या क्षेत्रांत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. मात्र, त्यासाठी केवळ प्रमाणपत्र मिळवून उपयोग नाही. प्रत्यक्ष कामाचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि सुरक्षिततेचे प्रशिक्षण आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार मेकॅनिकनीही आपले कौशल्य अद्ययावत केले, तर या क्षेत्रात रोजगारासह स्वतंत्र व्यवसायाची संधी मिळू शकते.

मेकॅनिकला काय शिकावे लागणार?

  • बॅटरीची तपासणी, देखभाल

  • मोटर, कंट्रोलरची दुरुस्ती

  • चार्जिंग यंत्रणेतील दोष शोधणे

  • इलेक्ट्रॉनिक यंत्रणेची माहिती

  • उच्च विद्युतदाबावर काम करताना सुरक्षितता

रोजगाराच्या संधी कुठे?

  • इलेक्ट्रिक वाहन मेकॅनिक

  • बॅटरी दुरुस्ती तंत्रज्ञ

  • सर्व्हिस टेक्निशियन

  • वाहन डायग्नोस्टिक तंत्रज्ञ

  • स्वतंत्र दुरुस्ती व्यावसायिक

Electric Vehicle Mechanics
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीच्या भाजी मंडईत कोथिंबीर १० रुपये जुडी; हिरवी मिरची, लिंबाचे दरही उतरले

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही वाढत आहे. बॅटरी मॅनेजमेंट, मोटर, कंट्रोलर आणि इलेक्ट्रॉनिक डायग्नोस्टिक्सचे प्रशिक्षण घेतल्यास तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळू शकतात. आर्थिक अडचणींमुळे कोणताही तरुण कौशल्य प्रशिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी अल्पदरात प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्यक्ष सरावावर भर दिल्यास तरुणांना या क्षेत्रात चांगले कौशल्य संपादन करता येईल.

नमिता झवारे, ट्रांस ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस.

इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल असल्याने विक्रीनंतरच्या सेवांची मागणीही वाढत आहे. मात्र, या वाहनांची दुरुस्तीसाठी बॅटरी, मोटर, कंट्रोलर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचे ज्ञान असलेले प्रशिक्षित मेकॅनिक सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वाहन विक्रीनंतर ग्राहकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा देताना समस्या येतात. तरुणांनी या क्षेत्रातील तांत्रिक प्रशिक्षण घेतल्यास त्यांच्यासाठी रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते.

सुभाष गीर, इलेक्ट्रिक वाहन विक्रेता, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.