

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहे. अतिशय नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या निवडणुकीत अखेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती झाली. जागावाटपानुसार भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला.
निवडणुकीपूर्वीच आमदार सुनील शेळके यांनी महायुतीतर्फे भाजपचे संतोष दाभाडे पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा केली होती. त्यानुसार, ते जनतेतून थेट निवडून नगराध्यक्ष झाले. प्रशासकीय काळात प्रलंबित असलेले रस्ते, पथदिवे, स्वच्छता, अतिक्रमण आणि पाणीपुरवठा हे प्रश्न नव्या पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते. गेल्या वर्षभरात काही समस्यांवर प्राधान्याने काम करण्यात आले असले, तरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे.
आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महायुतीची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, जागावाटपावरून सुरुवातीला अंतर्गत नाराजी निर्माण झाली. अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजीचा सामना करावा लागला. ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत समन्वय साधल्याने २८ पैकी तब्बल १९ जागा बिनविरोध झाल्या, तर केवळ नऊ जागांसाठी मतदान झाले. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव ही संकल्पना राबवत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. निर्मल वारीचे समन्वयक म्हणूनही त्यांची ओळख आहे. उपनगराध्यक्ष गणेश काकडे शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे
नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १८, तर भाजपचे १० नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपद भाजपकडे असले तरी संख्याबळ राष्ट्रवादीचे अधिक आहे. विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे संतोष भेगडे कार्यरत आहेत. राष्ट्रवादीचे सत्यम खांडगे पक्षप्रतोद आहेत. भाजपचे इंदरकुमार ओसवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमलता खळदे या गटनेत्या आहेत.
विविध समित्यांच्या सभापतींची जबाबदारी महत्त्वाची
नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम शेळके हे बांधकाम समिती सभापती, भारती धोत्रे या शालेय शिक्षण समितीच्या सभापती, तर शैलजा काळोखे या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आहेत. भाजपचे निखिल भगत हे आरोग्य समितीचे सभापती, तर दीपक भेगडे हे नियोजन समितीचे सभापती आहेत. या सर्व समिती सभापतींच्या नियुक्तीला येत्या फेब्रुवारीमध्ये एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानंतर या पदांवर अन्य नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
स्वीकृत नगरसेवकांच्या नव्या नियुक्त्यांकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवाजी आगळे आणि बाबा मुलानी, तर भाजपतर्फे सूरज सातकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचाही एक वर्षाचा कार्यकाळ संपत असल्याने आता पुढील स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे आव्हान, तर दुसरीकडे आगामी काळातील राजकीय पदवाटप आणि नव्या नियुक्त्या अशा दुहेरी घडामोडींमुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.