नवलाख उंबरे: मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील बधलवाडीमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने, निवेदने आणि उपोषणाचा मार्ग अवलंबूनही ठोस तोडगा निघालेला नाही. प्रत्येकवेळी संबंधित प्रशासनाकडून आश्वासने मिळतात. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
अंत्यसंस्कारासाठी मोठी गैरसोय
बधलवाडी परिसराचा झपाट्याने विकास होत असला तरी मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे. विशेषतः स्मशानभूमीसाठी स्वतंत्र आणि अधिकृत जागा नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. तर, पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते. या गंभीर विषयाकडे प्रशासनाने केवळ कागदी कार्यवाहीपुरते लक्ष दिल्याचा आरोप ग्रामस्थांसह अनिल बधाले, ग्रामपंचायत सदस्य पंडीत दहातोंडे, दशरथ बधाले, संजय भोसले, रामनाथ बधाले, पप्पू दहातोंडे यांनी केला आहे. या वेळी ग्रामस्थांनी मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहत एमआयडीसी प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.
प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या काही वर्षांत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. काही अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रस्ताव फाईलपुरताच मर्यादित राहिल्याचे दिसत आहे. आंदोलना वेळी नेतेमंडळी गावात येऊन सहानुभूती दर्शवतात; परंतु त्यानंतर विषय पुन्हा थंडावतो, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली. स्मशानभूमी हा केवळ एक भूखंडाचा प्रश्न नसून तो गावाच्या सन्मान आणि मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते यांसारख्या सुविधा जशा आवश्यक आहेत, तसाच सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा अधिकारही तितकाच महत्त्वाचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे पुन्हा एकदा सांगण्यात येत आहे. मात्र, आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अनेक आंदोलने आणि वारंवार दिलेली आश्वासने यानंतरही जर प्रश्न प्रलंबितच राहणार असेल, तर शासनव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी तातडीने निर्णय घेऊन बधलवाडीतील नागरिकांना न्याय द्यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीही जर आम्हाला संघर्ष करावा लागत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ही समस्या सोडवावी.निवृत्ती शेटे, माजी सभापती, पंचायत समिती
एमआयडीसी विभाग आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांना मूलभूत गरजांपासून वंचित रहावे लागत आहे.पंडित दहातोंडे, स्थानिक नागरिक
आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करुनही एमआयडीसीकडून निर्णय झाला नाही. लवकरात लवकर ही समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.पप्पू डिंबळे, नागरिक