पिंपरी: केंद्रीय अनुसूचित जाती आयोग कार्यालयाचे मुंबईत स्थलांतर करण्यात आले आहे. हे कार्यालय आकुर्डीमध्ये सुरू होते. दरम्यान, आता हे कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. येथील केंद्रीय सदन या ठिकाणी तळमजल्यावर असलेले हे कार्यालयचा 28 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असणार आहे. त्यानंतर अर्जदारांना मुंबई गाठावी लागणार आहे. पुण्यापेक्षा मुंबई अधिक खर्चीक असल्याने तेथे हे कार्यालय नको, अशी मागणी केली जात होती.
1983 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित पुण्यातून हे कार्यालय सुरू करण्यात आले होते. दरम्यान, 2006 मध्ये या कार्यालयाचे आकुर्डीतील केंद्रीय सदन या इमारतीत हे कार्यालय सुरू करण्यात आले होते. राज्यभरातील नागरिकांना तक्रार करण्यासाठी आकुर्डी हे मध्यवर्ती ठिकाण होते. या कार्यालयात अनेक तक्रारी अर्ज प्राप्त होत असत.
ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका तसेच राज्य व केंद्र सरकारचे विविध विभाग, पोलिस प्रशासनाच्या विरोधात दिवाणी व फौजदारी प्रकाराच्या तक्रारीदेखील या ठिकाणी दाखल दाखल होत. नागरिक दाद मागत असत. दरम्यान, हे कार्यालयाचे नागरिक, अर्जदार यांच्या मागणीमुळे स्थलांतर थांबले असे सांगण्यात येत होते.
मात्र, दोन महिन्यांपूर्वी हे कार्यालय मुंबईत स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचारीदेखील तेथे वर्ग करण्यात आले. यापूर्वी 12 अधिकारी व कर्मचारी होते. तर, काही बाहय संस्थेमार्फत रूजू करण्यात आले होते. त्यापैकी चार अधिकारी हे मुंबईत रूजू झाले आहेत.
कामकाजाचे अखेरचे काही दिवस
दोन महिन्यांपूर्वी येथील सर्व यंत्रणा, मुंबईत हलवली आहे. त्यामुळे संबंधित अर्जांवरील न्यायनिवडा तेथेच होतो. या ठिकाणी केवळ तक्रार अर्ज, पोस्टाचे अर्ज स्वीकारले जात आहेत; मात्र नागरिकांना माहिती होईपर्यंत दोन महिन्यांची वाढ देण्यात आली होती. आता 28 फेबु्रावारीपासून टपाल बंद करण्यात येणार असून, येथील कार्यालयास कुलूप लावले जाणार आहे.