Nashik Phata Pimpri Highway Encroachment Pudhari
पिंपरी चिंचवड

Nashik Phata Pimpri Highway Encroachment: नाशिक फाटा-पिंपरी महामार्गावर अतिक्रमणांचा विळखा; ‘महामार्ग की बाजारपेठ?’ असा सवाल उपस्थित

पदपथावर हातगाड्या, रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग; रविवारच्या गर्दीत वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: नाशिक फाटा ते पिंपरी दरम्यानच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्ग वर्दळीचा असूनही, लगतच्या पदपथावरच छोट्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने अस्ताव्यस्तपणे रस्त्यावरच उभी करत असल्याने इतर वाहनचालकांना मात्र वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे.

सुटीच्या दिवशी विक्रेत्यांकडे होणारी गर्दी महामार्गावरील वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचे चित्र दर रविवारी पहायला मिळाले. महामार्गाच्या कडेला विविध वस्तू विक्रीसाठी हातगाड्या लावण्यात आल्याने नागरिकांचीही मोठी गर्दी होते. अनेक दुचाकीस्वार येथे खरेदीनिमित्त अचानक ब्रेक मारून वाहन थांबवतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांना अचानक वेग कमी करावा लागत असून, काही वेळा वाहनांमध्ये धडक होण्याची शक्यता निर्माण होते.

एकीकडे महामार्गावरून वेगाने वाहतूक सुरू असताना दुसरीकडे रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे सुरू असलेली विक्री आणि खरेदीची लगबग यामुळे महामार्ग की बाजारपेठ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने नेहमीपेक्षा अधिक नागरिक खरेदीनिमित्त घराबाहेर पडत असल्याने या अतिक्रमणांचा वाहतुकीवर परिणाम आणखी जाणवत आहे.

अचानक ब्रेक, मागच्या वाहनचालकांची कसरत

हातगाड्यांवरील वस्तू पाहण्यासाठी वाहनचालक अचानक ब्रेक लावत असल्याचे अनेकदा दिसून येते. काही जण आपली वाहने थेट रस्त्याच्या कडेला उभी करून खरेदीसाठी थांबतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होण्याबरोबरच मागून येणाऱ्या वाहनांना अचानक परिस्थितीचा सामना करावा लागतो. दुचाकीस्वारांसाठी तर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.

प्रशासनाचे दुर्लक्ष की...

महामार्गालगत अतिक्रमण वाढत असताना संबंधित यंत्रणांचे याकडे कितपत लक्ष आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई झाली तरी काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी हातगाड्या उभ्या राहत असल्याचे चित्र अनेकदा दिसते. त्यामुळे केवळ कारवाईचा दिखावा न करता महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे धोका

महामार्गालगतच्या हातगाड्या आणि विक्रेत्यांमुळे केवळ वाहतुकीचा वेगच मंदावत नाही, तर काही वाहनचालक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने घेऊन येतात. अचानक समोरून येणारे वाहन, बाजूला उभ्या असलेल्या गाड्या आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत होते. विशेषतः रविवारच्या गर्दीत ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. नियम मोडून सुरू असलेली ही 'शॉर्टकट' वाहतूक मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरण्यापूर्वी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

रस्त्यावर अचानक एखादे वाहन ब्रेक लावून बाजूला थांबते. विक्रेत्यांकडून खरेदी करण्यासाठी वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो. या ठिकाणी मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी.
संभाजी कारले, वाहनचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT