Nashik Phata Kasarwadi Traffic Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Nashik Phata Kasarwadi Traffic Issue: नाशिक फाटा-कासारवाडीमध्ये अतिक्रमण, मेट्रो काम आणि वाहतूककोंडीने नागरिक हैराण

स्मार्ट सिटीतील विकासकामांचा फटका; पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकवर अतिक्रमण, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: नाशिक फाटा-कासारवाडी परिसरात सध्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एका बाजूला महामार्गालगत कार कस्टमाइझ स्टुडिओचे अतिक्रमण, दुसऱ्या बाजूला पाण्याच्या पाइपलाइनसाठी सुरू असलेले खोदकाम, त्यातच मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे पडलेला राडारोडा आणि सायकल ट्रॅक व पदपथावर दुचाकीस्वारांचा बिनधास्त कब्जा अशा समस्यांच्या विळख्यात हा परिसर अडकला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

विशेष बाब म्हणजे या सर्व प्रकाराकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अतिक्रमण, वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव आणि रखडलेली कामे यामुळे नागरिकांचा संताप वाढत असून, स्मार्ट सिटीच्या नावाखाली अजून किती हाल सोसावे लागणार ?, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उपाययोजना करण्याची मागणी

नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा विकासकामांचे फलक महत्त्वाचे ठरत आहेत का?, अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. आता तरी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अतिक्रमण हटवावे, कामांचे नियोजन करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

अपघाताचा धोका

स्मार्ट सिटीच्या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. कार्यालयीन वेळेत वाहनचालकांना वाहतूककोंडी, अरुंद झालेला रस्ता आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा सामना करत मार्ग काढावा लागत आहे. विशेषतः कार कस्टमाइझ स्टुडिओजवळील परिस्थिती धोकादायक बनली असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

पदपथांवर अतिक्रमण

पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले पदपथ आणि सायकल ट्रॅकही सुरक्षित राहिलेले नाहीत. दुचाकीस्वारांनी त्यावरच कब्जा केल्याने नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

नाशिक फाटा-कासारवाडी परिसरातील अतिक्रमणाबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. संबंधित ठिकाणाची पाहणी करून नियमबाह्य अतिक्रमणे आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, वाहतूक आणि पादचारी सुरक्षेला बाधा येणार नाही. यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना केल्या जातील.
पूजा दुधनाळे, क्षत्रिय प्रशासन अधिकारी, ह कार्यालय
नाशिक फाटा-कासारवाडी परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतुकीवर तात्पुरता ताण निर्माण झाला आहे. मात्र, वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
अमित डोळस, वाहतूक पोलिस निरिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT